राज्यात ‘नोटा’ची चलती

    06-Jun-2024
Total Views |
image 17
 
 मुंबई,  प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीने चक्रावणारे आकडे समोर आणले असतानाच, राज्यात ’नोटा’चा पर्याय निवडणार्‍यांनीही आश्चर्यचकीत केले आहे. राज्यातील 48 मतदारसंघात तब्बल ४ लाख १२ हजार ८१५ मतदारांनी ’नोटा’ (यापैकी कोणीही नाही) पर्याय निवडला आहे. ही संख्या एकूण मतदानाच्या ०.७२ इतकी आहे.
 
अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीने खाते उघडलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात ’नोटा’ला सर्वाधिक पसंती मिळाली. येथील २७ हजार २७० मतदांनी ’नोटा’ हा पर्याय निवडला. राज्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्या खालोखाल पालघरमध्ये २३ हजार ३८५ मतदारांनी नोटाला निवडले. मावळ आणि गडचिरोलीत ही संख्या साडेसोळा हजारांच्या पुढे राहिली. विशेषतः आदिवासी पट्ट्यातील मतदारांनी नोटाच्या माध्यमातून स्थानिक खासदारांच्या कामाला नापसंती दर्शविली.
 
पालघर, गडचिरोली पाठोपाठ नंदूरबारमध्येही १४ हजारांहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई आणि महानगर प्रदेशातील सर्वच मतदारसंघात नोटाला मिळालेल्या मतांची संख्या १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक राहिली. काही ठिकाणी नोटाचा आकडा तिसर्‍या क्रमांकावर झेपावला. राज्यातीलबहुतांश मतदारसंघांमध्ये छोटे पक्ष आणि अपक्षांच्यातुलनेत नोटाला अधिक मते मिळाली.