आमच्यासारखे आम्हीच!

    06-Jun-2024
Total Views |
Election Commission Staff


नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक काळातील देशभरातील प्रचाराचा धुरळा आणि त्यानंतरचे कवित्व यावर सर्वदूर मंथन होत आहे. आधी दैनिकांमधून ते होत होते, मग इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आली, आता तर सोशल मीडियावर देखील याची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करीत आहे. भारतीय लोकशाहीचा उत्सव म्हणून जगभरात ख्यात असलेल्या या निवडणुका यावेळी सात टप्प्यात पार पडल्या. जवळपास दोन सव्वा दोन महिने चालणारी ही प्रक्रिया. या कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रात निवडणूक आयोगाने अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत निवडणूक पार पाडली, ही बाब नक्कीच जागतिक पातळीवर दखलपात्र. विविध विचारसरणी आणि आकारमानात देखील वैविध्य असलेल्या या राष्ट्रात अशा तर्‍हेने एक आयोग एवढ्या मोठ्या यंत्रणांना अगदी शिस्तबद्ध, नियोजनपद्धतीने कामाला लावून या लोकशाही उत्सवाचे सौंदर्य वाढवितो, हे नक्कीच प्रशंसनीय. पहिली लोकसभा निवडणूक झाल्यापासून ते २०२४च्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या या आयोगाने प्रत्येक निवडणुकीत केलेली कामगिरी ही अतिशय उत्तम प्रशासकीय नियोजनाचे आदर्श उदाहरण आहे, हे मान्य केले पाहिजे. या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे, या देशाच्या भवितव्याची सूत्र ज्यांच्या हाती सोपवायची असतात, त्या लोकप्रतिनिधींना या देशातील सुजाण मतदारांनी निवडून देण्याची प्रक्रिया आहे. लोकशाहीचे सौंदर्य वाढविणारी ही प्रक्रिया यावेळी सात टप्प्यांत पार पडली. यासाठी देशभरातील शासकीय कार्यालयांत कार्यरत वर्ग अतिशय तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडत होता. त्यांच्या अमाप पसारा असलेल्या कार्याचा डोलारा सांभाळण्याच्या कार्याचे कौतुक केलेच पाहिजे. देशभरातील मतदारांना मतदानासाठी आधी प्रत्येक सकारात्मक पातळीवर उद्युक्त करणे आणि मग हाच मतदार जेव्हा मतदानासाठी येतो, तेव्हा त्याचा ‘मतदार राजा’ म्हणून सन्मान करणे, ही अनोखी आणि लाजवाब कर्तव्याची पद्धती प्रशंसनीयच म्हटली पाहिजे. विविध विचारसरणी असलेल्या कोट्यवधी देशवासीयांना एकसुत्रात बांधून लोकशाही उत्सवाची शान वाढविणारे भारतातील सर्व कर्मचारी खरोखरच अभिमानाने ‘आमच्यासारखे आम्हीच’ असे म्हणण्यास गौरवपात्र आहेत.

अशी ही बनवाबनवी...


लोकसभा निवडणुकीचा ज्वर आपल्या देशात या वर्षीच्या आरंभापासूनच चढल्याचे चित्र होते. कालानुरूप राजकीय परिस्थिती बदलली तसे या निवडणुकांकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलत गेला. यावेळी तर राजकीय परिस्थितीचा नूर काही औरच होता. आजतागायत आणि गेल्या दशकात राजकारणातील नेत्यांंचा वावर बघितला, तर नक्कीच याचा अंदाज अनेक सुज्ञांना आला असेल. बनवाबनवी करणारे म्हणून काही राजकीय पक्षांकडे बघितले जात असले तरी त्यांच्यातील मतदार राजाने त्याला धडा शिकविल्यानंतर झालेले परिवर्तन देखील या देशाने बघितले आहे. आपल्या देशातील लोकशाहीचे काही अनाकलनीय किस्से हे सामान्यांना अचंबित करीत असतात. रिंगणात असलेले उमेदवार, त्यांची संपत्ती, त्यांची राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टी जगजाहीर असताना देखील त्यास निवडून देण्यासाठी मतदार राजा पुढे आलेला बघायला मिळाला आणि हे उमेदवारदेखील आपण आपल्या मागील काहीबाही बिरूदं असली तरी लोकांसाठी रिंगणात असल्याचे सांगून या प्रक्रीयेत सहभागी झालेले असतात. कधी कधी अशा लोकांना खरोखरच आपण निवडून द्यायचे का, असा प्रश्न देखील मतदारांना पडलेला असतो. मात्र, कालांतराने ही मानसिकता बदलत गेली. भारतीय घटनेचा आणि कायद्याचा आदर राखूनच त्या कक्षेतचे अशा उमेदवारांसाठी ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. काही उमेदवार तर हौस म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले असतात की काय, असा प्रश्न देखील पडतो. या उमेदवारांचे किस्से हा देखील एक चर्चेचा विषय असतो. अर्थात, त्याला किती महत्त्व द्यायचे, हे सगळे सामूहिक लोकमत ठरवित असते. काही उमेदवार चक्क तुरूंगात राहून निवडणूक लढवित असतात, यावेळीही असे नमुने होतेच. आपल्या लोकशाहीच्या उदारमतवादी व्याख्येत ते बसत असल्याने, देशातील संविधानाने दिलेला अधिकार ते बजावत असल्याने, त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. तरी निव्वळ यंत्रणेला कामी लावणे, वेळेचा दुरूपयोग करणे, कारण नसताना प्रक्रियेत समाविष्ट होणे, या सगळ्या बाबी मग कालांतराने ‘अशी ही बनवाबनवी’च्या व्याख्येत जाऊन बसतात, हे मात्र नक्की!

 
- अतुल तांदळीकर