सौर ऊर्जेवर भर दिल्याने महावितरण आव्हानांसाठी सज्ज

महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    06-Jun-2024
Total Views |

mahavitran


मुंबई, दि. ६ : प्रतिनिधी 
महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल. सौर ऊर्जेचा वापर महावितरण साठी क्रांतिकारी ठरणार असून त्याच्या वापरामुळे भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी महावितरण पूर्णपणे सज्ज आहे, अशी खात्री महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
महावितरण कंपनीचा १९ वा वर्धापन दिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकेश चंद्र बोलत होते. कार्यक्रमाला म.रा.वि.म.सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की, राज्यातील सुमारे ३ कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करणारी महावितरण ही देशातील सर्वोत्तम वीज वितरण कंपनी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा तर करताच येईल. त्याशिवाय महावितरणच्या सर्वच ग्राहकांना याचा दिलासा मिळणार आहे. तसेच आरडीएसएस योजनेमुळे वीज यंत्रणेचे सक्षमीकरण होऊन महावितरणला भविष्यात विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. यंत्रणेचे सक्षमीकरण करताना स्पर्धेच्या युगात ग्राहक सेवेचा दर्जा नेहमी सर्वात्कृष्ट ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, महावितरणने नेहमीच विविध योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीतून देशात कायम अव्वल स्थान राखले आहे. यापूर्वी भारनियमन, वीज तुटवडा सारख्या वेगवेळ्या आव्हानांवर महावितरणने यशस्वी मात केली आहे. वर्ष २०३० साठी नियोजन करताना कंपनीची आर्थिक स्थिरता चांगली असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यादृष्टीने सौर ऊर्जेचा जास्तीत-जास्त वापर, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वसुलीवर परिणामकारक तोडगा, वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व वीज हानी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ही सर्व कामे करण्यात येत आहे.