‘रामायण’चा रिमेक बनवू नका! रणबीरच्या चित्रपटावर दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केलं मत

    06-Jun-2024
Total Views |
 
Ramayan
 
 
मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आता रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्र दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडत म्हटले की, “ 'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली नाही पाहिजे”.
 
मुलाखतीत दीपिका चिखलिया म्हणाल्या की, "मी प्रामाणिकपणे सांगते की जे लोक रामायणवर चित्रपट बनवतात त्यांच्यावर माझी नाराजी आहे. कारण, तुम्ही हे नाही केलं पाहिजे. सारखं सारखं रामायणवर आधारित कलाकृती बनवल्या नाही पाहिजेत. कारण, जेव्हा जेव्हा तुम्ही रामायण बनवता तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन कथा, नवीन अँगल, नवीन लूक...काहीतरी वेगळं हवं असतं," असं त्या इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणत होत्या.
 
दीपिका चिखलिया पुढे असं देखील म्हणाल्या की, "धार्मिक ग्रंथांचा कोणीही चुकीचा वापर करू नये. त्यामुळे हे करू नका. रामायण व्यतिरिक्त असे खूप विषय आहेत. ज्यावर सिनेमे बनवता येतील. स्वातंत्र्यसैनिकांवर करण्यासारखं खूप काही आहे. पण, फक्त रामायणावरच यांना चित्रपट का बनवायचा आहे?", असा प्रश्नही त्यांनी विचारला. दरम्यान, ‘रामायण’ हा नितेश तिवारींचा चित्रपट दोन भागांमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे. आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही भागांचं शुट एकत्रच करण्यात येत आहे.