रा.स्व.संघाचे नरहर गोपाळ वाणी यांचे निधन

    06-Jun-2024
Total Views |
 
mahamtb44
 
 कल्याण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे माजी ठाणे जिल्हा संघटनमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी ठाणे विभाग कार्यवाह, माजी हिंदूमंच अध्यक्ष नरहर गोपाळ तथा आण्णा वाणी (वय 86) यांचे बुधवार, दि. 5 जून रोजी सकाळी 5.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई आणि नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
 
टिटवाळा भागात व ठाणे जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्थात त्यांनी काम केले आहे. मामनोली येथील हिंदू सेवा संघाचेही ते उपाध्यक्ष होते. उत्कृष्ट वक्ता असलेल्या आण्णांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, टिटवाळा, डहाणू, वाडे, जव्हार, पालघर, वसई या सर्व भागांत भाजपला कार्यकर्ते मिळवून दिले. त्यांचे संघटन केले. ‘रामभाऊ म्हाळगी’ व चिंतामणराव वनगा यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
 
त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सायंकाळी काढण्यात आली. मंगल आशा, घोडेखोत आळी, शाहू महाराज चौक, आग्रारोड येथून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, भाजप व रा.स्व.संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, टिटवाळा व कल्याणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवावर लालचौकी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.