उबाठातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर फोडलं पराभवाचं खापर

    06-Jun-2024
Total Views |

Khaire & Danve 
 
छत्रपती संभाजीनगर : विरोधी पक्षनेते इथे यायचे दहा मिनिटं बसायचे आणि निघून जायचे. मग मी एकटा पडलो, असे म्हणत उबाठा गटाच्या चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंचं नाव न घेता त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी तब्बल १ लाख ८० हजार मतांधिक्याने चंद्रकांत खैरेंचा पराभव केलाय. यावर आता खैरेंनी प्रतिक्रिया दिली.
 
चंद्रकांत खैरे म्हणाले की, "हा मनाला लागणारा पराभव आहे. इतकं प्रामाणिकपणे काम करुन आणि उद्धवजींनी सपोर्ट करूनही भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना मदतान केलं गेलं. काही लोकांनी बदमाशी केली आहे. मला कुठेतरी धोका झाल्याची जाणीव झाली. मला सगळे लोकं म्हणायचे की, आम्ही तुम्हाला मतदान केलं. मग हे मतदान गेलं कुठे?," असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  "लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे आधुनिक शकुनी!"
 
ते पुढे म्हणाले की, "पक्षांतर्गत धोका झाल्याचा मला संशय आहे. याबद्दल मी पक्षप्रमुखांना सगळं सांगणार आहे. खरंतर आमचे दोन जिल्हाप्रमुख आहेत. त्यातले एक जिल्हाप्रमुख आजारी झालेत. ते उठलेच नाहीत. दुसरे जिल्हाप्रमुख विरोधी पक्षनेते आहेत. ते इथे यायचे दहा मिनिटं बसायचे आणि निघून जायचे. मग मी एकटा पडलो. मी एकटा काम करत होतो. विरोधी पक्षनेता आता मोठा माणूस झाला आहे. तो अजून मोठा होवो. त्यांनी जिल्हाप्रमुखपद सोडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जास्त लक्ष देऊन काम करायला हवं होतं. मी माझी कैफियत उद्धव साहेबांना सांगणारच आहे," असे म्हणत त्यांनी अंबादास दानवेंवर आरोप केले आहेत.