देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडू देणार नाही!

भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय

    06-Jun-2024
Total Views |
BJP Maharashtra Core Committee news

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात देवेंद्र फडणवीस या एकमेव नेत्याने २०० हून अधिक सभा घेतल्या. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे, ते सरकार सांभाळून पक्षाचे काम करू शकतात. त्यामुळे आमच्या कोअर कमिटीने निर्णय घेतलाय, की आम्ही त्यांना सरकारमधून बाहेर पडायला देणार नाही. वरिष्ठ नेत्यांनाही आम्ही तशी विनंती करणार आहोत, अशी माहिती भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवार, दि. ६ जून रोजी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील पक्षाला वेळ देत होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली १०५ आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत २०० हून सभा घेण्याचा विक्रम राज्यात कोणी केला आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी ती किमया केली. त्यांच्यात ती क्षमता आहे. ते सरकार सांभाळून पक्षाचे काम करू शकतात, लोकांत जाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी सरकारमधून बाहेर पडू नये, अशी आमची भूमिका असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

संजय राऊत हे मूर्ख आहेत. त्यांच्यावर बोलणेही उचित वाटत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. पराभव झाल्यानंतर नैतिकतेने जबाबदारी स्वीकारायला मोठे मन लागते. ती जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आणि पक्षाकडे मागणी केली, की मला सरकारमधून मुक्त करा. जेणेकरून पक्षाचे संघटन मजबूत करून विधानसभा ताकदीने लढवता येईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांची हिम्मत वाढवून लोकांच्या हितासाठी पुन्हा मैदानात येणार, असा त्या मागील अर्थ असल्याचे दरेकर म्हणाले.

शरद पवार जातीपतीचे राजकारण करतात
 
प्रवीण दरेकर म्हणाले की, शरद पवार हे जातीपतीचे राजकारण करतात. लोकांच्या मनात विष पसरवायचे, पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे, पण कृती त्याविपरीत करायची. बीडमध्ये एकमेकांच्या ताटात जेवणारे एकमेकांना शिव्या देऊ लागले आहेत. वातावरण बिघडले आहे. हे पवारांचे पुरोगामीत्व आहे का? असा सवालही त्यांनी केला.