युगेंद्र पवारांची बारामती कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी?

    06-Jun-2024
Total Views |
Yugendra


मुंबई :
बारामती लोकसभेचा कौल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युगेंद्र पवार यांची बारामती कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत.अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर बारामतीत लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटला. या संघर्षात दादांचे बंधू श्रीनिवास यांनी शरद पवार आणि सुप्रिया यांची साथ दिली. त्यांचे पूत्र युगेंद्र या सर्वात आघाडीवर होते. त्यांनी बारामती विधानसभेचा कोपरान् कोपरा पिंजून काढत सुप्रिया सुळेंना आघाडी मिळवून दिली. त्यामुळे नाराज झालेल्या अजित पवार यांनी निकालानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत युगेंद्र पवारांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हटवल्याची चर्चा आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलवली. त्यात कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवारांना दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले. या निर्णयामुळे येत्या काळात पवार कुटुंबातील कटुता कमी होण्याची आशा मावळली असून, अजित पवार यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा बारामतीत आहे.
 
 
या निर्णयाबाबत माहिती नाही. मला कुणीही अध्यक्षपदावरुन हटवले असल्याचे अधिकृतरित्या सांगितलेले नाही. कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली, त्यात काहीतरी निर्णय झाल्याची माहिती माझ्याकडे आहे.  - युगेंद्र पवार, अध्यक्ष, बारामती कुस्तीगीर परिषद