“अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला”, ‘रामायणा’तील लक्ष्मणाची नाराजी

    06-Jun-2024
Total Views |

ramayan
 
मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर झाला. परंतु, अयोध्येतील नागरिकांनी भाजपला साथ न दिल्यामुळे कलाकार मंडळींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका ज्यांनी साकारली होती ते अभिनेते सुनील लहरी देखील यामुळे दु:खी झाले असून त्यांनी एका पोस्टद्वारे अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पराभव झाला.
 
सुनील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मतदारांवर सडकून टीका करत लिहिले आहे की, “आपण विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी सीतामाता वनवासातून परतल्यानंतर त्यांच्यावरही संशय घेतला होता. देव स्वतः जरी प्रकट झाले, तर त्यांनाही नाकारेल इतके स्वार्थी हिंदू आहेत. अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला याचा पुरावा इतिहासातही आहे”.
 
 

ramayan
 
तर आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “अयोध्येतील लोकांनो आम्ही तुमच्या महानतेला सलाम करतो, तुम्ही तेच आहात ज्यांनी देवी सीतेलाही सोडलं नाही. तर मग प्रभू रामांना त्या छोट्या टेंटमधून एका सुंदर मंदिरात विराजमान करणाऱ्यांचा विश्वासघात करणं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. संपूर्ण भारत देश तुमच्याकडे पुन्हा कधीही आदराने पाहणार नाही.”
 

ramayan 
 
दरम्यान, दुसरीकडे याच मालिकेतील प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल भाजपच्या तिकिटावर मेरठमधून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. याशिवाय अभिनेत्री कंगना राणावत आणि हेमा मालिनी यांनी देखील या लोकसभा निवडणूकीत भरघोस मतांनी विजय मिळवला आहे.