ओडिशात पहिल्यांदा कमळ फुलणार; पटनायकांचा दारुण पराभव!

    05-Jun-2024
Total Views |
bjp odisha naveen patnayak


नवी दिल्ली :       लोकसभा निवडणुकीसोबतच ओडिशा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ओडिशात पहिल्यांदाच नवीन पटनायक यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांनी मोफत वीज देण्याचे आश्वासन जनतेला दिले. परंतु, राज्यातील जनतेने पटनायक यांना सपशेल नाकारले असून भाजप पहिल्यांदाच ओडिशात सरकार स्थापन करणार आहे. विशेष म्हणजे पटनायक यांनी स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी दोन जागांवर निवडणूक लढवली, पण त्यांना एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागला.
ओडिशा विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा दारुण पराभव झाला आहे. भाजपने १४७ जागांपैकी ७८ जागांवर विजय मिळवित बहुमतासह सत्तास्थापन करणार आहे. तर बीजेडीला केवळ ५१ जागांवर समाधान मानावे लागले असून अपक्ष आमदार हिमांशू साहू यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या आमदारांची संख्या ७९वर पोहोचली आहे.

नवीन पटनायक यांच्या बीजेडीने ओडिशात १०० युनिट मोफत वीज, सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वयंसेवी गटांना आर्थिक मदत आणि इतर आश्वासने दिली होती, परंतु ४ जून रोजी निकाल लागला तेव्हा ओडिशात बिजू जनता दलाचा दारुण पराभव झाला. ओडिशातील सामान्य लोकांनी बीजेडीला पर्याय म्हणून भाजपचा विकास, रोजगार निर्मिती आणि समस्यांवर दीर्घकालीन उपाय यास कौल दिला आहे.