सागर संशोधिकेचा प्रवास

    05-Jun-2024
Total Views |
Prachi Hatkar

मुंबईत समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत वाढलेल्या आणि सागरी संशोधक म्हणून कार्यरत प्राची हटकर यांच्याविषयी...

समुद्री गाय (डुगाँग), समुद्री कासवे तसेच सागरी परिसंस्थेवर अनेक वर्षं काम केलेल्या आणि नुकत्याच समुद्री कासवांच्या मृत्यूविषयी ज्यांचा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला, त्या प्राची हटकर. त्यांचा जन्म मुंबईतलाच. लहानपणापासूनच समुद्रावर खेळायला म्हणून जाण्याची सवय असलेल्या प्राची यांचा सागरी प्रवास खरंतर तिथपासूनच सुरू झाला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समुद्रावर फिरायला जाणं, किनार्‍यावर खेळणं, शंख-शिंपले गोळा करणं हा त्यांचा अगदी आवडीचा विषय. हळूहळू मोठं झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे शंख गोळा करून आणायचे आणि त्यांचा संचय करून ठेवायचा, हे त्यांना आवडत असे. सागरी संशोधनाकडे प्रवास सुरु झाल्यानंतर शंखशिंपलेसुद्धा एक सजीव असतात, हे प्राची यांच्या लक्षात आलं. त्यांचं परिसंस्थेतील महत्त्व समजू लागल्यानंतर, बालपणीचा त्यांचा हा छंद संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी बंद केला. मुंबईतच प्राची यांचं संपूर्ण शिक्षण झालं. वडील वकील असल्यामुळे मुलीनेही एलएलबी करावं, अशी प्राची यांच्या वडिलांची इच्छा होती, तर मोठा भाऊ आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला प्राची यांना देत होता. पण, निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी आवड आहे, विज्ञान आवडतं यादृष्टीने प्राची यांनी ‘झुओलॉजी’ला प्रवेश घेतला.

ठाकुर कॉलेजमधून ‘झुओलॉजी’ पूर्ण केल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. शिक्षिका किंवा संशोधक असे दोनच पर्याय समोर होते. पण, त्यांना शिक्षिका होण्यात फार काही रस नव्हता. त्याऐवजी संशोधन आणि संवर्धनासाठी काम करावं, असं त्यांच्या मनी असल्यामुळे त्यांनी पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पण, त्यावेळी समुद्रविज्ञान, ‘एंडोक्रनिलॉजी’ अशा मोजक्याच विषयांमध्ये ‘मास्टर्स’ करता येत होतं. समुद्रविज्ञान अर्थात ‘ओशनोग्राफी’चा पर्याय स्वीकारत त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सध्या त्या याच विषयामध्ये पीएचडी करीत आहेत. पदव्युत्तर पदवीनंतर नोकरीच्या शोधात असलेल्या प्राची यांना ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या संस्थेत इंटर्नशिपची संधी मिळाली. अगदी छोट्याशा कमाईतून पण मनासारखं काम मिळाल्यावर इंटर्नशिपनंतर त्यांचं याच संस्थेमध्ये नोकरीसाठी निवड झाली. नोकरी करताना त्यांना या कालावधीमध्ये ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या सागरी कासव सॅटेलाईट टॅगिंगच्या प्रयोगात काम करायला मिळालं. या प्रयोगामध्ये त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांसाठी माहितीपर सत्रही घेतले. काही कारणास्तव हा प्रकल्प पुढे न गेल्यामुळे पुन्हा मुंबईत परतत त्यांनी ‘कॅन्सलटीज’मध्ये काम सुरू केलं. ‘अल्ट्राटेक’, ‘डेटॉक्स टेराकॉन’ अशा वेगवेगळ्या कॅन्सलटीजमध्ये त्यांनी काम केलं.

समुद्री परिसंस्थेमध्ये डॉल्फिनसारखाच आणखी एक सस्तन प्राणी म्हणजे डुगाँग म्हणजेच समुद्री गायी असतात, हे त्यांना त्यावेळी माहीत नव्हतं. या विषयावर माहिती झाल्यानंतर त्यांनी या विषयावर काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू जनसामान्यांनाही याबद्दल माहिती नाही, हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळे या विषयावरचं अधिक काम करण्याचं त्यांनी निश्चित केलं असून, सध्या त्या याबरोबरच ‘समुद्री गवत’ या दुर्लक्षित विषयावरही अभ्यास करत आहेत. याच समुद्री गायीच्या अधिवास तसेच संवर्धनासाठी त्या कार्यरत आहेत. पर्यावरण मंत्रालय आणि ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांच्या माध्यमातून जवळ जवळ नऊ वर्षं हा प्रकल्प राबवला जात असून, यासाठी त्या गुजरातच्या कच्छमध्ये कार्यरत आहेत. काही भागांमध्ये असलेली डुगाँगची संख्या वाढवण्यावर त्यांचं संवर्धन करण्यावर भर दिला गेला असून, समुद्री गाय या सागरी परिसंस्थेतील प्रमुख प्रजाती म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. याच समुद्री गायीच्या संवर्धनासाठी प्राची आता ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ सोबत संशोधनाचे काम करत आहेत.
महाराष्ट्रातील काही किनार्‍यांवर अंडी घालणारी समुद्री कासवे मृतावस्थेत आढळतात. नैसर्गिक कारणांमुळे किंवा अनेकदा मानवी हस्तक्षेपामुळे या कासवांचा मृत्यू होतो. ही गंभीर बाब लक्षात घेता, कासव मृत्यूची संख्या, कारणे आणि ठिकाण याविषयी प्राची यांचा संशोधन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या माहितीच्या आधारे या संभावित ठिकाणांवर येत्या भविष्य काळात रेस्क्यू किंवा ट्रीटमेंट सेंटर उभारता येऊ शकतं, जेणेकरून कासवांना उपचारासाठी लांब प्रवास करण्याची गरज भासणार नाही आणि अनेक कासवांचे प्राण वाचू शकतील. ‘वुमन्स डायव्हर्स हॉल ऑफ फेम’ या संस्थेची ग्रांट, धवल स्मृती ‘वाईल्डलाईफ सेव्हियर अ‍ॅवार्ड’, ‘ओशन कन्झर्वेशनिस्ट’ म्हणून नामांकन अशा अनेक सन्मानांनी त्याना गौरविण्यात आले असून, त्यांना यापुढेही संवर्धनासाठी मोठे काम करण्याची इच्छा आहे. समुद्री कासवांबरोबरच सागरी सस्तन प्राण्यांविषयी त्यांना संशोधन करायचे आहे. या क्षेत्रात येऊ पाहात असलेल्या तरुणांना पालक आणि समाजाने प्रोत्साहन द्यायला हवं, असं मत त्या व्यक्त करतात. प्राची यांच्यातील सागर संशोधक आणि संवर्धिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!