अमिताभ यांना खरं काय ते सांगितलं आणि नोकरी गेली, ‘पंचायत’ फेम फैजल मलिकने सांगितला किस्सा

    05-Jun-2024
Total Views |

amitabh 
 
 
मुंबई : सध्या सर्वत्र पंचायत ३ वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. कथानकासोबतच प्रत्येक कलाकारही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. यातील प्रल्हाद चाचा अर्थात फैजल मलिक यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यामुळे नोकरी गेल्याचा एक किस्सा सांगितला आहे.
 
पंचायत ३ मध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन गेले ते म्हणजे प्रल्हाद चाचा. अभिनेते फैजल मलिक यांनी ही भूमिका साकारली आहे. लेक देशासाठी शहिद झाल्यानंतर आलेला एकटेपणा, जगण्याचं कारण गावात, गावकऱ्यांमध्ये शोधणाऱ्या प्रल्हाद चाचाला प्रेक्षक प्रचंड प्रेम देताना दिसत आहेत.
 
‘पंचायत 3' रिलीज झाल्यानंतर फैसल याची जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अमिताभ यांची भेट घेतल्यानंतर त्याच्या हातून त्याचा प्रोजेक्ट गेल्याचे म्हटले. विशेष म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यप स्वत: फैसलला बिग बींच्या भेटीला घेऊन गेले होते.
 
फैजल म्हणाले की, "मुळात बच्चन साहेबांना भेटणार या विचारानेच मी खूश झालो होतो. त्यांना पाहिल्यावर मला काही सुचलंच नाही. म्हटलं खड्ड्यात गेलं ते काम आधी मी त्यांचा ऑटोग्राफ घेतो. त्यांच्या घरी गेल्यावर आमच्यासमोर खाण्याचे पदार्थ येत होते. यावेळी बोलत असताना मी अलाहाबादचा असल्याचं त्यांना सांगितलं आणि मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांनी मला तिळाचे लाडू खाणार का? असं विचारलं. त्यानंतर त्यांनी लगेच लाडू मागवले. मला वाटलं त्यांचं वय पाहता त्यांना ते लाडू खाता येणार नाहीत. पण, माझ्या आधी त्यांनीच दोन लाडू फस्त केले. ते खरोखरच वयाच्या मानाने खूप तरुण आहेत", असं फैसल म्हणाला.
 
पुढे ते म्हणाले की, "स्क्रिप्ट रिडींग सेशन दरम्यान जो माणूस स्क्रिप्ट वाचत होता त्या ओव्हर कॉन्फिडेंट होता. पण, बच्चन यांना ६२ नंबरच्या पेजवर चूक सापडली. त्यांनी १२० पेजची सगळी स्क्रिप्ट लक्षात होती. विशेष म्हणजे चूक दाखवण्यासाठी त्यांनी स्क्रिप्ट पाहिली सुद्धा नाही. स्क्रिप्ट रिडींग सेशननंतर त्यांनी लगेच विचारलं की, तुम्ही कसला विचार करताय की, आम्ही याचं शूट कधी सुरु करणार हाच ना? त्यांच्या या प्रश्नावर, सर आपण हे आता शूट नाही करु शकत. आपण सहा महिन्यानंतर याचं शूट करुयात, असं मी म्हटलं. मिटींग संपल्यानंतर ज्यावेळी आम्ही त्यांच्या घराबाहेर पडलो त्यावेळी मला सांगण्यात आलं की, यापुढे तू या प्रोजेक्टवर काम करणार नाहीस. तुला हा प्रोजेक्ट सोडावा लागेल. मी बच्चन साहेबांसमोर खरं बोललो त्याचा हा परिणाम होता.