मोदींची भीती आणि जग

    05-Jun-2024
Total Views |
modi


भारतात तिसर्‍यांदा पुन्हा रालोआ बहुमताने जिंकली. मोदी पुन्हा सत्तेत येतील. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरच्या प्रतिक्रिया पाहणे गरजेचे. चीनचे म्हणणे असे की, भारतात मोदी पुन्हा येणार, पण आता बहुमत मोठ्या संख्येने आले नाही. त्यामुळे आता चीनसोबत प्रतिस्पर्धा करणे किंवा भारतात उद्योग-व्यवसाय आणखी चांगले बनवण्याची मोदींची महत्त्वाकांक्षा ते पूर्ण करू शकत नाहीत.

थोडक्यात, चीनला समाधान आहे की, आता भाजप आणि मोदींकडे संपूर्ण बहुमत नाही. सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांची सोबत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मोदी चीनच्या कटकारस्थानाला पूर्वीइतके उत्तर देऊ शकणार नाहीत. तसेच भारताला चीनच्या बरोबरीची आर्थिक महासत्ता बनवू शकणार नाहीत. चिनी माध्यमांनीही भाजपने एकट्याच्या बळावर बहुमत मिळवले नाही, याबाबत आनंदच व्यक्त केला आहे. दुसरीकडे भिकेच्या पंथाला लागलेले पाकिस्तानचे राजकीय नेते म्हणत आहेत, ”बरे झाले, भाजपला बहुमत मिळाले नाही. आता आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान बघायची इच्छा आहे. कारण, मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतातील बहुसंख्यावाद जागा झाला होता. हे भारताच्या शेजारी राष्ट्रांसाठी चांगले नव्हते. या अशा परिस्थितीमध्ये राहुल काय अगदी अरविंद केजरीवाल किंवा ममता बॅनर्जी जरी पंतप्रधान बनणार असेल, तर आम्ही त्यांना सहकार्य करू.” आता इथे पाकिस्तानी नेत्यांची लायकी काय बोलता काय, हा डायलॉग लागू होतो. पण, पाकिस्तानी नेत्यांना नरेंद्र मोदींची केंद्रातील भाजप सरकारची इतकी भीती आहे का?

तर याचे कारण पाकिस्तानचा विचारवंत अभ्यासक प्रो. डॉ. मुजीब अफजलच्या विधानात दिसते. ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, ”९०च्या दशकात कोणी विचारही केला नसता की, हिंदुस्थानात कुणी तरी एक माणूस येईल आणि तो हिंदुत्व इतक्या सहजपणे देशात पुन्हा सर्वमान्य करेल.” तर पाकिस्तानला हे पचनीच पडत नाही की, पूर्वी पाकिस्तान भारतामध्ये सहज दहशतवादी कृत्ये करायचा, त्यांच्या त्या संस्कृतीचा प्रचार-प्रसारही भारतात सुखनैव करायचा. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानचे आर्थिक, राजकीय कंबरडेच मोडले. याचे दुःख पाकिस्तानला होतेच. पण, १९६१ किंवा १९६५ सारखे भारतावर हल्ला करण्याची ताकद पाकिस्तानमध्ये २०१४ नंतरच्या नव्या भारताने ठेवलीच नाही. आता मोदी पुन्हा सत्तेत येतील आणि भारताला आणखीन सुस्थिर करतील, ही भीती पाकिस्तानला सतावते. सन २०४७ पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र बनावे, यासाठी जंगजंग पछाडणार्‍यांना २०४७ सालापर्यंत भारत जगद्गुरू बनावा, असे स्वप्न पाहणारे नरेंद्र मोदी खटकणारच. पाकिस्तान हा त्यातलाच एक भाग. या निवडणुकीच्या जय-पराभवाचे विश्लेषण करताना जगभरातल्या प्रसार-प्रचार माध्यमांनी जी मते मांडली, त्यामध्ये मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांना ‘हिंदू राष्ट्रवादी नेता’ आणि ‘हिंदू राष्ट्रवादी पार्टी’ असेच संबोधले आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने लिहिले की, अपेक्षेप्रमाणे मोदींना परिणाम प्राप्त झाले नाहीत. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी पार्टीला विरोधी पक्षाने जोरदार झटका दिला.

दुसरीकडे मोदींना अपेक्षेप्रमाणे कमी जागा का मिळाल्या, याबाबत जागतिक स्तरावरच्या काही वर्तमानपत्रांनी जी विश्लेषणे केली आहेत, ती पाहू. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लिहिले की, विरोधी पक्षाने लोकांच्या मनात भीती निर्माण केली की, भाजप-मोदी सत्तेत आल्यावर संविधान बदलतील. तर फ्रान्सच्या ‘ली मोंडे’ या वृत्तपत्राने लिहिले की, मोदींना इतक्याच जागा मिळाल्या. त्यामुळे आता ते संविधान बदलू शकत नाहीत. खरे तर मोदींनी किंवा भाजपने कधीही संविधान बदलू असे म्हटलेच नव्हते. मात्र, हे विदेशी वर्तमानपत्रात कसे लिहिले गेले? कारण, मोदी किंवा केंद्रातील भाजप सरकारने कधीच संविधान बदलू असे विधान केले नव्हते. मात्र, एक विचार करण्यासारखे आहे की, हीच आंतरराष्ट्रीय स्तराच्या वर्तमानपत्रांची बोली निवडणुकीदरम्यान राहुल गांधी, उद्धव ठाकरे ते अगदी शरद पवार बोलत होते. याचा परस्पर काही संबंध असेल का? शेतकरी आंदोलनात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे टुलकीट आपण पाहिले आहे. असो. पाकिस्तान, चीन तसेच हिंदू बहुसंख्य भारताचे धर्मांतरण करावे, अशी इच्छा असणार्‍या पाश्चात्य शक्तींना मोदी पुन्हा सत्तेत येणार याबद्दल भीती आहे. ही भीतीच नरेंद्र मोदी या सच्च्या भारतीय सुपुत्राचे यश आहे.