उबाठाच्या अदृश्य हातांनी आम्हाला निवडणूकीत मदत केली; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

    05-Jun-2024
Total Views |
 
UBT
 
मुंबई : उबाठाच्या अदृश्य हातांनी आम्हाला निवडणूकीत मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. बुधवारी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून भाजप नेते नारायण राणे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले.
 
नितेश राणे म्हणाले की, "१० वर्ष असलेल्या विनायक राऊतांसारख्या निष्क्रिय खासदाराला बदलायचं असं इकडच्या मतदारांनी ठरवलं होतं. गेली ४० वर्ष सिंधुदुर्गच्या जनतेसाठी राणे साहेबांनी केलेली सेवा आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मतदानाच्या माध्यमातून दिलेली आहे."
 
हे वाचलंत का? -  लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
 
"यापुढे प्रत्येक निवडणूकीत महायूतीने ताकदीने उतरायचं असेल तर प्रत्येकाने महायूतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे. उबाठा आणि महाविकास आघाडी यांना एकमेव शत्रू मानूनच आपण काम केलं पाहिजे. कुठेही उबाठा आणि मविआला मदत होत असेल तर ताकद असतानाही पुढच्या निवडणूका महायूतीला अवघड जातील," असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "काही हिशोब यापुढे व्याजासकट चुकते करण्याची आमची तयारी आहे. उबाठाच्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो. काही अदृश्य हातांनी आम्हाला निवडणूकीत मदत केल्यामुळे आमचा विजय सुकर झाला. हिंदुह्रदयम्राट बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी राणे साहेबांना मदत करण्याचं ठरवल्याने आम्हाला त्यांचं सहकार्य झालं. काही शिवसैनिकांना काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आवडली नव्हती. तसेच विनायक राऊतांनी या जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचं काम केल्याने त्याचा वचपा या निवडणूकीत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे," असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे.