बहुमताच्या सरकारचा इतिहास!

    05-Jun-2024
Total Views |
 
 narendra modi
 
 मुंबई : लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता संपली असून देशाच्या जनतेने बहुमताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत, रालोआच्या बहुमताच्या सरकारला कौल दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रालोआला सलग तिसर्‍यांदा बहुमत मिळाले असून, सलग तीन वेळा बहुमत मिळवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. कारण, भारतीय निवडणुकीच्या इतिहासात, फार कमी वेळा सलग तीनवेळा बहुमत एखाद्या पक्षाला अथवा आघाडीला मिळाले आहे.
 
भारतीय निवडणुकीच्या इतिहासाचा अभ्यास केला असता, 1947 साली स्वातंत्र्य मिळवल्यावर 1952 साली पहिली निवडणूक 499 जागांसाठी लढवली गेली. या निवडणुकीत पंडित नेहरूंच्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 364 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस हा एकमेव पक्षाने तीन अंकी संख्या गाठली होती. त्यानंतर 37 अपक्ष उमेदवार निवडून आले होते, ही द्वितीय क्रमांकाची मोठी संख्या होती.
 
दुसर्‍या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पंडित नेहरूंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बहुमत मिळाले. त्यावेळी काँग्रेसला 371 जागांचे पाठबळ जनतेने दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 42 अपक्ष उमेदवार निवडून आले होते, ही द्वितीय क्रमांकाची मोठी संख्या होती. 1962 साली झालेल्या तिसर्‍या राष्ट्रीय निवडणुकीत पंडित नेहरूंच्याच नेतृत्वात काँग्रेसने पुन्हा बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, यावेळी त्यांना दहा जगांचे नुकसान सहन करावे लागले. तिसर्‍या निवडणुकीत त्यांना 361 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर 1967 साली झालेल्या निवडणुकीत, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या 283 जागा आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या 1971 सालच्या निवडणुकीत काँग्रेसने 352 जागा जिंकल्या. मात्र त्यानंतर काँग्रेसचा विजयरथ जनता पक्षाने रोखत 1977 च्या निवडणुकीत 295 जागा मिळवल्या होत्या.