महानिर्मिती कार्यालयात पर्यावरणदिन उत्साहात साजरा

निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन व वृक्षारोपण

    05-Jun-2024
Total Views |

mahanirmiti


मुंबई, दि. ५ : प्रतिनिधी 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने मंजुनाथ बागडे (प्रकल्प नियोजन, मुंबई), विक्रांत ओक (चंद्रपूर), लक्ष्मीकांत नेवे (भुसावळ), मकरंद परदेशी (चंद्रपूर), विश्वास उगले (चंद्रपूर) यांच्या सहभागातून छायाचित्र प्रदर्शन अधिक प्रभावी झाले. मंजुनाथ बागडे आणि सुशांत पाटील यांनी निसर्ग छायाचित्रे व ट्रेकिंगचा अनुभव कथन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते प्रकाशगड मुख्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले तसेच कागदांपासून तयार केलेले पेन आणि झाडांच्या बियांसह अभिनव ग्रीटिंग कार्ड सर्व मान्यवरांना देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संचालक संजय मारुडकर म्हणाले की, “पर्यावरणीय चळवळ ही एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर त्यावर काम व्हायला हवे, त्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे”. याप्रसंगी पर्यावरणीय शपथ प्रत्येकाने घेऊन पर्यावरणाशी कटीबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला. सदर प्रसंगी महानिर्मितीचे अधिकारी आणि सुरक्षितता कक्षाचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी केले.