जगन्नाथाचा रथ...

    05-Jun-2024
Total Views |
BJP Wins Odisha and andra pradesh


केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारने गेल्या दहा वर्षांत जे लक्षणीय काम केले, त्याचाच भाग म्हणून देशभरातून रालोआला मतदान झाले. प्रस्थापितांविरोधात मतदान होण्याची शक्यता असताना, प्रस्थापितांच्या बाजूने एवढ्या मोठ्या संख्येने झालेले मतदान हे लक्षणीय असेच. हा जगन्नाथाचा रथ आहे, हे ओडिशातील निकालांनी अधोरेखित केले आहे.
 
अयोध्येत श्रीरामाच्या जन्मभूमीवर भव्य असे मंदिर निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत असताना झाले. ‘मंदिर वही बनायेंगे’ असा संकल्प ज्या भाजपने सोडला होता, त्या भाजपने संकल्प सत्यात कसा आणायचा, हे कृतीतून दाखवून दिले. जानेवारी महिन्यात श्रीरामाच्या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर, देशभरातून भाविकांची अयोध्येत रीघ लागली. लाखो भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. अयोध्येत भाविकांची होणारी वाढती गर्दी तेथील अर्थकारणाला चालना देत आहे. असे असतानाही, अयोध्येत भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशमधील सर्वच्या सर्व जागांवर भाजपला निश्चित विजय मिळेल, असे संकेत मिळाले असतानाही, तेथे अखिलेश यादव यांच्या पक्षाचा झालेला विजय हा धक्कादायक! ज्या मुलायमसिंह यादव यांच्या कार्यकाळात कारसेवकांवर गोळीबार झाला, शरयूचे पाणी रक्तरंजित झाले, त्या मुलायमसिंहांच्या पक्षाला तेथील मतदारांनी दिलेला कौल हा चकित करणारा ठरला, तर दुसरीकडे ओडिशा आणि आंध्र प्रदेशात रालोआने जोरदार मुसंडी मारली.

ओडिशातील पुरी येथील श्रीजगन्नाथाची रथयात्रा हा महासोहळा. हा सोहळा अनुभवण्यासाठी जगभरातून श्रद्धाळू मोठ्या संख्येने येतात. जगन्नाथाचा हा रथ ओढणारी एक अदृश्य शक्ती असते, अशी मान्यता आहे. श्रीजगन्नाथाच्या रथामागील या शक्तीचा प्रत्यय भाजपला आला, असे म्हणता येते. मंगळवारी लोकसभेचे निकाल जाहीर होत असताना, देशभरातील जनता भाजपच्या मागे उभी असल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या चार राज्यांचा अपवाद वगळता सर्वत्र भाजपला मतदान झाले. हे कल जाहीर होत असतानाच, ओडिशा तसेच आंध्र प्रदेश येथे झालेल्या विधानसभांचे निकालही समोर आले. ओडिशात २४ वर्षे बिजू जनता दलाची सत्ता अबाधित होती. ती सत्ता भाजपने खेचून घेतली. म्हणजेच, आणखी एक राज्य भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, असे हे निकाल अगदी स्पष्टपणे सांगतात. तसेच आंध्र प्रदेशातही जनतेने कौल दिला तो रालोआलाच. ओडिशातील विधानसभेत तर भाजपने घवघवीत यश मिळवलेच, त्याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगला जनाधार मिळाला. नवीन पटनायक गेल्या २४ वर्षांत तेथे एकही निवडणूक हरले नव्हते. मात्र, भाजपने त्यांना ओडिशात पराभूत करण्याचा पराक्रम करून दाखवला. त्याचवेळी ओडिशातील संख्याबळही वाढवले.
 
लोकसभेच्या २१ पैकी २० जागा भाजपने जिंकल्या. उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या भरवशाच्या राज्यातून संख्याबळ घटत असताना, ओडिशाने केंद्रातील भाजप सरकारच्या कामावर केलेले शिक्कामोर्तब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास हा महत्त्वपूर्ण ठरला. देशभरातून भाजप सरकारच्या बाजूने कौल मिळाला आणि राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. दक्षिणेतील राज्यांमध्ये कर्नाटकचा अपवाद वगळता अन्यत्र कुठेही भाजपला आजवर यश मिळाले नव्हते. २०२४च्या निवडणुकीत भाजपने केरळ तसेच आंध्र प्रदेशमध्ये विजय मिळवत, दक्षिणेत प्रवेश केला आहे, असे म्हणता येईल. आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपच्या रालोआतील घटक पक्ष तेलुगू देसम पार्टीने विधानसभेत सरकार स्थापनेसाठीचे आवश्यक ते संख्याबळ मिळवण्यास यश मिळवले. आंध्र प्रदेशमध्ये रालोआला सन्मानजनक जागा मिळाल्या, हेही महत्त्वाचे. चंद्राबाबू नायडू हे रालोआचे जुने सहकारी. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते सहभागी पक्ष होते.

दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी जगनमोहन रेड्डी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर, चंद्राबाबू विधानसभेतून बाहेर पडले होते, तेव्हा मुख्यमंत्री म्हणूनच आपण सभागृहात परत येऊ, अशी शपथ त्यांनी घेतली होती. भाजपबरोबर तेथे सरकार स्थापन करत, त्यांनी आपला शब्द राखला आहे. मुख्यमंत्री झाले, कर्तृत्ववान झाले. बंद खोलीतील न दिलेल्या वचनांचा दाखला देत, तडजोडीचे, लाचारीचे राजकारण न करता, त्यांनी जनतेच्या दरबारात आपले म्हणणे मांडले आणि जनतेने त्यांना कौलही दिला. राज्यातील नादान विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चंद्राबाबू यांचा आदर्श समोर ठेवायला हवा. केंद्रातील रालोआचे ते आता सन्माननीय सदस्य पक्ष आहेत. त्यामुळे केंद्रातही त्यांचा योग्य तो मान नक्कीच राखला जाईल, हे नक्की. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेशमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या होत्या. आयटी क्षेत्राचा पाया त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये रचला, असे म्हटले तर त्यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. राज्याला विशेष दर्जा देण्याची त्यांनी मागणी अमान्य झाली, म्हणून ते रालोआतून बाहेर पडले होते. तथापि, एक राजकारणी म्हणून त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय असेच.
 
१३ वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. २०१९ मध्ये जगनमोहन यांनी त्यांचा केलेला पराभव मोठा हाता. मात्र, चंद्राबाबू यांनी या पराभवातून फिनिक्ससारखी उभारी घेत, आज दणदणीत विजय मिळवला आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी तसेच विभाजनानंतर मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले ते एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. हैदराबादचा सायबर सिटी म्हणून विकास करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. तसेच राज्याची नवीन राजधानी अमरावती उभारण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. रालोआचे निमंत्रक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे देशभरात त्यांचे नाव आहे. ‘अबकी बार ४०० पार’ हा नारा प्रत्यक्षात आलेला नसला, तरी भाजपने मिळवलेले यश हे उल्लेखनीय असेच. अनेक राज्यांतून भाजपने पैकीच्या पैकी जागा मिळवल्या आहेत. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली, त्याची पोचपावती त्यांना देशाने दिली, असे म्हणावे लागेल. प्रस्थापित सरकारविरोधात मतदान होण्याची भीती दहा वर्षांनंतर नक्कीच असते. मात्र, प्रस्थापितांच्या बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले, हाही विक्रमच. पंतप्रधान मोदी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतीलच. त्याउलट, विरोधक ‘इंडी’ आघाडीतील २८ पक्ष एकत्र येऊनही भाजपचा विजयरथ रोखू शकले नाहीत, हे त्यांचे मोठे अपयश. ते त्यांनी मान्य करायला हवे आणि भाजपचे कौतुकही करायलाच हवे. हा जगन्नाथाचा रथ आहे, आपणच तो ओढतो आहोत, ही भावना मनात असली, तरी पुरे!