छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन ध्येयपथावर कार्यरत राहणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहणार

    04-Jun-2024
Total Views |
pm narendra modi addressedनवी दिल्ली :
    तब्बल सहा दशकांनी भारतीय मतदारांनी भाजप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) दोन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या आघाडीस तिसऱ्यांदा सत्ता दिली आहे. ही भारतीय मतदारांची कृपाच असून आपल्या तिसऱ्या कार्यकाळातही भ्रष्टाचारविरोधी लढा सुरूच राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणित रालोआचे सत्तेत पुनरागमन निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील पं. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील विस्तारित भाजप मुख्यालयात देशवासियांना संबोधित केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते.

देशात १९६२ सालानंतर म्हणजे तब्बल सहा दशकांनी भारतीय जनतेने नवा इतिहास रचला आहे. सलग दोन कार्यकाळानंतर भाजपप्रणित रालोआस तिसऱ्यांदा सत्ता दिली असून याद्वारे भारतीय जनतेने भाजप आणि रालोआवर कृपा करून आपला आशीर्वाद दिला आहे. या निकालामुळे भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निकालामुळे विकसित भारताच्या निश्चयाचा विजय झाला असून आता विकसित भारताच्या लक्ष्यासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची वेळ आली आहे.
 
गेल्या दहा वर्षात अनेक मोठे निर्णय घेतले असून पुढील कार्यकाळात भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. यंदाचे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ध्येयपथावर वाटचाल सुरूच ठेवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधी आघाडीच्या एकत्रित जागांची बेरीजही एकट्या भाजपएवढी नसल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश येथे काँग्रेसचे सुपडा साफ झाला आहे. ओडिशात भाजप प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे, तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार स्थापन होणार आहे.
 
केरळमध्येही प्रथमच भाजपचा खासदार विजयी झाला असून तेथे भाजपच्या अनेक पिढ्यांचा संघर्ष आणि बलिदान यास फळ आले आहे. त्याचप्रमाणे तेलंगणात भाजपची संख्या दुप्पट झाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात छत्तीसगढ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात तर जवळपास क्लीन स्वीप दिला आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशात चंद्राबाबू तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या साथीने चमकदार यश मिळवले आहे.


माझ्यासाठी भावूक क्षण

आई सोबत नसतानाची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे आपण काहीसे भावूक होतो, मात्र देशातील मातांनी आपल्यावर तेवढ्याच स्नेहाचा वर्षाव केला आहे. राष्ट्रप्रथच हेच आपले ध्येय असून यापुढील काळातही त्याच ध्येयाने आपण कार्यरत राहू, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.


आव्हाने येणारच, मात्र ती पार करण्याचा विश्वास – जगतप्रकाश नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
 
राष्ट्र प्रथम या भावनेने काम करताना अनेक आव्हाने येणारच. मात्र, त्या आव्हानांचा सामना करून ती पार करण्याचा विश्वास जनतेच्या जनाधारातून प्राप्त झाला आहे. ज्यांच्यासाठा स्वार्थ महत्त्वाचा आहे, अशा पक्षांच्या आघाडीस जनतेने पुन्हा सत्तेपासून दूर ठेवून आपला इरादा स्पष्ट केला आहे. या विजयाचे श्रेय भाजपचे कार्यकर्ते आणि रालोआ घटकपक्षांच्या परिश्रमांना आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले आहे.