ओडिसात २५ वर्षानंतर सत्ताबदल होण्याची शक्यता; भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल

    04-Jun-2024
Total Views |
 NAVIN
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणुकीची अर्धी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यातचं आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुद्धा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एनडीए ३०० चा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
 
अबकी बार ४०० पारचा नारा दिलेल्या एनडीएसाठी हा धक्का असला तरी, एनडीएला आंध्र प्रदेश मध्ये आणि भाजपला ओडिसातून आनंदाची बामती येत आहे. आंध्र प्रदेशात एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर ओडिसात तब्बल २५ वर्षानंतर सत्ता परिवर्तन होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. १४७ विधानसभा जागा असलेल्या ओडिसात आतापर्यंत १४० जागांचे सुरुवातीचे कल आलेले आहेत.
 
ओडिसातून आलेल्या कलानुसार, पहिल्या क्रमांकावर भाजप आहे. ओडिसात भाजपला ७२ जागांवर आघाडी मिळाली आहे. मागच्या २५ वर्षापासून सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांच्या पक्षाला ५२ जागांवर आघाडी मिळवता आलेली आहे. ओडिसात काँग्रेसनं देखील १२ जागांवर आघाडी मिळवली आहे. लोकसभा निवडणूकीत अपेक्षेनुसार निकाल लागत नसताना भाजपसाठी ओडिसात आनंदाची बातमी आहे.