बेंगळुरू : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनाला होणारा विलंब चिंतेचा विषय आहे का, याबाबत ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (इस्रो)चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून सुनीता विल्यम्सच्या परत येण्यास उशीर होणे, ही फार चिंताजनक बाब म्हणून पाहिली जाऊ नये. कारण, आयएसएस हे काम करत आहे. बर्याच काळापासून एक सुरक्षित जागा आहे.
तसेच, हे फक्त सुनीता विल्यम्स किंवा इतर कोणत्याही अंतराळवीर अडकल्याचे प्रकरण नाही. एखाद्या ठिकाणी कोणी अडकणे, ही अशी कथा नाही की ज्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे. खरेतर अंतराळ स्थानकावर नऊ अंतराळवीर आहेत. ते सर्व अडकलेल्या अवस्थेत नाहीत. संपूर्ण गोष्ट म्हणजे ‘बोईंग स्टारलायनर’ नावाच्या नवीन क्रू मॉड्युलची चाचणी केली जात आहे. यामध्ये काही अडचणी येऊ शकतात, हे गृहीत धरलेले आहे.”
सुनीता विल्यम्सच्या धाडसाचा ‘इस्रो’ला अभिमान
“सुनीता विल्यम्स यांच्या धाडसाचा ‘इस्रो’ला अभिमान वाटतो. आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या नावावर अनेक मोहिमा आहेत. नवीन अंतराळयानाच्या पहिल्या उड्डाणात प्रवास करणे ही धाडसाची बाब आहे. त्या स्वतः डिझाइन टीमचा भाग आहेत आणि त्यांनी इनपुट दिले आहेत. त्यांनी क्रू मॉड्युलदेखील वापरले आहे. परंतु, मी त्यांना यशासाठी शुभेच्छा देतो.” डॉ. सोमनाथ म्हणाले, “आज जेव्हा आपण स्टारलाइनरसारखे अंतराळयान विकसित करतो, तेव्हा ते पुढे आणि परतीच्या प्रवासासाठी विश्वासार्हपणे काम करू शकेल का, असा प्रश्न पडायला हवा. संबंधित एजन्सी त्याचाच विचार करत आहे,” असे मला वाटते.