विरोधाला विरोध हीच भूमिका

30 Jun 2024 22:41:29
mukhyamantri ladaki bahin yojana


‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेला काँग्रेसने केवळ विरोधाला विरोध याच हेतूने विरोध करण्याचे पाप करत आहे. तांत्रिक मुद्द्यांची पूर्तता केली असतानाही, राज्यातील सुमारे 3.50 कोटी महिलांना याचा लाभ मिळेल, हे लक्षात आल्यानेच, महायुती सरकारला त्याचा फायदा मिळू नये, या राजकीय हेतूने, विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध करण्याचे ठरवले आहे.

मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ या योजनेला काँग्रेसने केवळ विरोधाला विरोध, या राजकीय हेतूने विरोध करण्याचे पाप केले आहे. विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना जाहीर केली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी केली असल्याचा आरोप करत, विजय वडेट्टीवार यांनी या योजनेला विरोध केला आहे. सरकार या योजनेतून मतदारांना आकर्षित करत असल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. वडेट्टीवार यांनी तर या विरोधात आपण, विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे म्हटले आहे. येत्या 1 जुलैपासून ही योजना लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना राखी बांधून, त्यांचे आभारही मानले. मात्र, आता काँग्रेसने या योजनेचा सत्ताधारी महायुती सरकारला लाभ होईल, हे लक्षात घेत या योजनेची अंमलबजावणी रोखण्याचे कारस्थान आखले आहे.

विरोधकांनी ज्या योजनेला विरोध केला आहे, ती ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ नेमकी काय आहे, हेही पाहायला हवे. यातील पात्र महिलांना दरमहिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील 3.50 कोटी महिलांना याचा फायदा होईल, असे मानले जाते. यासाठी 21 ते 60 वयाची अट असून, वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारांपेक्षा कमी असायला हवे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधीची तरतूद केली जाणार आहे. ही योजना तत्काळ लागू झाली आहे. या योजनेचे लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील कोणी प्राप्तिकर भरत असेल, अशांना त्याचा लाभ मिळणार नाही

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, त्यावर चर्चा होऊन विधिमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतरच, अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते, आणि शासन निर्णय काढता येतो, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महायुती सरकारने ही प्रक्रिया डावलली, आणि मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा शासन निर्णय काढला. हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या योजनेचा शासन निर्णय अर्थात जीआर काढून, महायुती सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. अर्थसंकल्पाला अजून मान्यताच मिळाली नाही, तर हा जीआर कसा काढला गेला? असा त्यांचा प्रश्न आहे. त्याचवेळी, या योजनेचे श्रेय अजित पवारांना मिळू नये, यासाठीच मुख्यमंत्री शिंदे यांनी अध्यादेश काढला, असे अजब तर्कट जयंत पाटील यांनी मांडले आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादासाठी हा प्रकार केल्याचे पाटील यांना वाटते.

अर्थातच, महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने चालणारे महायुती सरकार सत्तेवर असल्याने, विरोधकांचा आवाज दाबण्याचे अथवा मुस्कटबाजीचे राजकारण केले जात नाही. त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधकांचा आवाज दाबला जात होता. मग, ते नेते असोत वा माध्यमे किंवा सामान्यजन, त्यांना व्यक्त होण्याचेही स्वातंत्र्य मविआने दिले नव्हते. त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलण्याचे स्वातंत्र्यच नव्हते. मात्र, याच मविआतील घटक पक्ष संविधान वाचवायचे आहे, असे अपप्रचार करत असताना, लोकसभा निवडणुकीत देशाने पाहिले. खोटे बोल पण रेटून बोल, ही मविआतील उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची मानसिकताच आहे. त्याला कोणीही काहीही करू शकणार नाही.

नकारात्मक मानसिकतेतून बाहेर या, असा टोला मंत्री शंभुराजे देसाई यांनी विरोधकांना लगावला आहे, तो योग्य असाच. महायुतीचे सरकार श्रेयवादाची लढाई लढणारे नाही, तुम्ही नकारात्मक मानसिकतेतून बाहेर यावे, असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले आहे, ते विरोधकांनी नीट समजून घ्यावे. सभागृहात अर्थसंकल्प वाचून झाल्यानंतर, मंत्रिमंडळ बैठकीत आधीच घेतलेल्या निर्णयावर, शासन आदेश काढला तरी तो चालतो, असे म्हणत त्यांनी या योजनेचा जो शासन आदेश निघाला आहे, त्याची कायदेशीर बाजू समजावून सांगितली आहे. गोरगरीब महिलांना पैसे मिळू नयेत, अशी तुमची भावना आहे का? असा त्यांनी विचारलेला सवाल विरोधकांच्या मानसिकतेवर प्रहार करणारा आहे. सरकारने प्रत्येक कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे, असे सांगत, त्यांनी जे विरोधी पक्ष सत्तेत असताना महिलांना काहीही देऊ शकले नाहीत, त्यांना आमच्या योजनेमुळे महिलांची मते मिळणार नाहीत अशी भीती वाटत आहे. त्यामुळेच ते तांत्रिक मुद्दे वापरत आहेत, असा सणसणीत आरोप त्यांनी केला आहे.

मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच, दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, जून 2022 मध्ये विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शिवसेनेतील 16 आमदारांसह गुजरातचे सुरत शहर गाठले होते, आणि त्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली होती. त्यानंतर शिवसेनेतील आणखी 24 आमदार त्यांना जाऊन मिळाले. पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनी गुवाहाटी गाठले. त्यानंतर ते मुंबईत परतले, आणि त्यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच भाजपाबरोबर हातमिळवणी करून, राज्यात सत्तास्थापन केली. या घटनेला दोन वर्षे काल पूर्ण झाली. राज्यातील जनतेने 2019 मध्ये भाजप-शिवसेना पक्षाला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी हा जनादेश नाकारत, काँग्रेससमोर लाचारी पत्करत, काँग्रेसच्याच साथीने राज्यातील जनतेवर महाविकास आघाडी लादली. उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय अमान्य करत, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपबरोबर जात, जनादेशाचा आदर केला. राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

लाडकी बहीण, ही योजना राज्यातील महिलांच्या हिताचा विचार करूनच राबवण्यात येत आहे. तथापि, विरोधकांना ती पचनी पडली नाही. स्वतः जनहिताची कोणतीही कामे केली नाही, आणि सत्ताधारी महायुतीला ती करू द्यायची नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या ज्या जागा कमी झाल्या, त्या ध्रुवीकरणामुळे. एकगठ्ठा मते भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात गेल्यामुळेच, भाजपचे संख्याबळ कमी झाले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे यात काडीचेही कर्तृत्व नाही. असे असतानाही, कमी झालेले संख्याबळ हे आपलेच कर्तृत्व असल्याच्या थाटात, हे नेते वावरत आहेत. मात्र, असे असूनही केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार सत्तेवर आले आहे. हे वास्तव विरोधकांनी समजून घ्यायला हवे. भ्रमातून त्यांनी बाहेर पडण्याची आवश्यकता असताना, आजही ते विजयाच्या उन्मादात आहेत. जो झालेलाच नाही.

Powered By Sangraha 9.0