क्रिकेटचे व बार्बी डॉलचे क्रीडाप्रेमी...

30 Jun 2024 21:56:42
cricket babrie doll deepa karmakar


भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. सर्व सामने जिंकल्याने भारताला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. भारतीय खेळाडूंनी जगाला जिंकले. असेच जगाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडत, जिम्नॅस्टिकसम्राज्ञी नादिया कोमनेसी हिनेही कौतुक करावे, अशी कामगिरी करणार्‍या दीपा करमाकर आणि तिच्या बार्बी डॉलविषयी या लेखात जाणून घेऊया...

क्रिकेटमध्ये भारताने घेतला बदला : कर्णावतीच्या (अहमदाबाद) नरेंद्र मोदी क्रीडागारात दि. 19 नोव्हेंबर 2023 रोजी, ऑस्ट्रेलियाने भारतास हरवत, क्रिकेटचा चषक ऑस्ट्रेलियात नेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चित्रपटसृष्टीतील तारे-तारका, दिग्गज उद्योगपती अन् दीड लाख प्रेक्षकांसमोर, ऑस्ट्रेलियाने भारतीयांचा स्वप्नभंग केला होता. दि. 24 जून 2024 रोजी वेस्टइंडीजच्या सेंट लुसिया येथील ’सुपर आठ’ संघांसाठीच्या सामन्यात, रोहित शर्मा आणि सहकार्‍यांनी उपांत्य फेरीपूर्वी त्या कांगारूंच्या संघाला पराभूत केले. पाकिस्तानपाठोपाठ ऑस्ट्रेलियालाही स्वतःच्या घरचा रस्ता दाखवत, मागील पराभवाचे उट्टे काढलेले आपण अनुभवले. यापूर्वी टी-20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीतच आमनेसामने होते. तेव्हा इंग्लंडने भारताला धूळ चारली होती. आता भारताने त्या पराभवाची परतफेड करत, शुक्रवार, दि. 27 जून रोजी इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आणि, अंतिम फेरी गाठली. शनिवार, दि. 29 जून रोजी रात्री रंगलेल्या टी-20 चषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश करणार्‍या, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत हा विश्वचषक रोहित शर्माने भारतात परत आणला आहे. असा हा भारतीय क्रिकेट सेनानी रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी अभिनंदनास पात्र ठरले आहेत. असे हे भारतीय क्रिकेट आज जगात ‘सुपर’ ठरले आहे.

प्रारुपे क्रिकेटची : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण जो सामना हरलो, तो सामना होता 50 षटकांचा, तर ऑस्ट्रेलियाला नामोहरम करणारा 24 जूनचा सामना होता 20 षटकांचा. असे हे क्रिकेट एकच, पण त्या क्रिकेटची प्रारुपे मात्र किती भिन्न! कसोटी आणि मर्यादित षटकांचे सामने विविध करंडक पटकवण्यासाठी सदानकदा चालूच असतात. त्याला अर्थपूर्ण पाठबळ देणारेही अनेकजण सदैव तत्पर असतात. आपल्या या लेखाची सुरुवातच मला क्रिकेटने करावीशी वाटण्याचे कारण म्हणजे क्रिकेटला अर्थिक पाठबळ देणार्‍या एका बहुचर्चित वादग्रस्त उद्योगपतीची मला झालेली आठवण. तसे म्हटले, तर त्याने केवळ क्रिकेटच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक सम्राज्ञीसहित अनेक क्रीडापटूंची दखल घेत, त्यांना सन्मानितही केले होते. आपण त्या वादग्रस्त व्यक्तीचा उल्लेख पुढे करणार आहोतच.

क्रीडेला लागतो सहारा : सोमवार, दि. 3 जून 2024ला जगातील अब्जाधीशांची एक यादी फोर्ब्स नियतकालिकाने प्रसिद्ध केली असून, त्यात रिलायन्सच्या अंबानींचे नाव 12व्या स्थानावर झळकले आहे. तसेच अमेरिकेतील जगद्विख्यात ‘टाईम्स’च्या प्रभावशाली उद्योगसमुहांच्या यादीत रिलायन्सचेही नाव आपल्याला दिसेल. क्रिकेटच नव्हे, तर अगदी ऑलिम्पिक समिती सदस्या नीता मुकेश अंबानी यादेखील क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी करत असतात. आजतरी या अंबानींच्या नावाला बट्टा लागलेला आपल्याला दिसत नाही. अंबानींसारख्या जगप्रसिद्ध व्यक्ती वगळता, अनेकदा यावेळेस जो प्रायोजक असेल, तोच पुढच्या काही काळासाठी असेलच असे नाही. क्रिकेटला सहारा द्यायला कधी विजय मल्ल्या येऊन जातो, तर कधी जमिनीपासून आकाशापर्यंत व्यवसायाचा विस्तार करणारा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळ्याच्या परिसरातल्या अ‍ॅम्बी व्हॅलीचा एक जनक, ज्याला विविध अर्थिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता आणि कैदेत राहण्याचीही वेळ त्याच्यावर आली होती, ज्याला ‘इंडिया टुडे’ने 2012 मध्ये दहाव्या क्रमांकाचा प्रभावशाली भारतीय उद्योगपती म्हणून घोषित केले होते, असा वादग्रस्त ठरलेला फॉर्म्युला वन या (ऑटो रेसिंग) म्हणजे मोटारींच्या शर्यती, हॉकी व क्रिकेटचा प्रायोजक सुब्रतो रॉय. पुण्याजवळील गहुंजे येथील मैदानाला प्रारंभी सुब्रतो रॉयचे नाव देण्यात आले होते. क्रिकेटमध्ये भारताने ऐतिहासिक विश्वचषक जिंकल्यानंतर, सहाराने क्रिकेटपटू आणि अन्य क्रीडापटूंसहित अनेक जागतिक स्तरावरील तारे-तारकांना घरांची सप्रेम भेट दिली होती. जागतिक सुंदरी ठरलेली ऐश्वर्या राय, क्रिकेटपटू सौरव गांगुली अशांच्या नामावलीत रोमानीयाची जिम्नॅस्टिकपटू नादिया कोमानेसीही होती. ही नादिया अ‍ॅम्बी व्हॅलीच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपैकी एक होती. तीच ती नादिया की जिने जिम्नॅस्टिकमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले होते. नादिया कोमानेसीने 1976 साली तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदके, आणि 1980 साली दोन ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकली आहेत.

प्रारुपे क्रीडेची : क्रिकेटचे किती भिन्न प्रकार आहेत हे जसे आपण पाहिले, तसे प्रकार बर्‍याच क्रीडाप्रकारांतही आढळतात. हॉकी, फुटबॉलपासून ते अगदी नादियाच्या जिम्नॅस्टिक या प्रसिद्ध क्रीडाप्रकारापर्यंत. सर्वसाधारणतः जिम्नॅस्टिक म्हणजे एकच साचेबद्ध प्रकार. त्यात खेळाडूची लवचिकता, ताकद आणि तोल यांची परीक्षा लागत असते. मूळ ग्रीक शब्द ‘जिम्नॉस’ हे व्यायाम अनावृत वा उघड्या शरीराने केले जात, त्यावरून हा शब्द आला. जिम्नॉसवरून ‘जिम्नॅस्टिक्स’, ‘जिम्नेशिअम’ तसेच ‘जिमखाना’ हे शब्द रूढ झाले, असे इतिहास सांगतो. या खेळाचे तीन प्रकार ऑलिम्पिकमध्ये खेळवले जातात. आर्टिस्टिक कलात्मक जिम्नॅस्टिक, क्रोबेटिक जिम्नॅस्टिक आणि रिदमिक जिम्नॅस्टिक. ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक ढीरािेश्रळपश : स्प्रींग असलेल्या चौकटीवर बसवलेले, दणकट कॅनव्हाससदृश कापडावर सर्कसपटू कसरतीचा सराव करतात. अउठजइअढखउ अंगचापल्यविषयक ठहूींहाळल लयबद्ध कसरत करत प्रेक्षकांना ते मंत्रमुग्ध करत असतात. त्या क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावरची विदेशी नादिया, आणि भारताची नादिया किंवा बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली दीपा करमाकर. आजचा लेख हा जिम्नॅस्टिक्सच्या या बार्बी डॉलला जरी प्रामुख्याने समर्पित करत असलो, तरी आपण सतत पैकीच्या पैकी गुण मिळवणार्‍या नादिया कोमनेसीचा आवर्जून उल्लेख करणार आहोत.

शतशः गुणी : नुकत्याच ज्या क्रिकेट टी-20 विश्वचषक स्पर्धा झाल्या, त्यात सगळे सामने जिंकून दाखवणारा भारताचा कप्तान मुंबईकर रोहित शर्मा आपण पाहिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत, छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा सागर बोरमणीकर हिने 100 टक्के गुण मिळवले. तसे करणारी तनिषा ही एकमेव मुलगी ठरली.तनिषा ही आंतररारष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळते. तनिषा अभ्यासाएवढीच खेळातही हुशार आहे. मालदीवमधल्या युवा स्पर्धेत तनिषाने दुसरा क्रमांक पटकावत, कांस्य पदक मिळवले होते. फक्त अर्ध्या गुणांनी तिचे सुवर्ण पदक हुकले होते. विविध स्तरांवर खेळलेल्या या बुद्धिबळपटूला, प्रत्यक्ष बोर्डाच्या परीक्षेत 582 आणि क्रीडा गुण 18 असे एकूण 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य, याचा परिणाम तिच्या निकालात आपल्याला दिसतो. खेळात पैकीच्या पैकी गुण मिळवणारे, अनेक क्रीडापटू जीवनातही यशस्वी होतात. पैकीच्या पैकी गुण संपादन करणे, हे खचितच स्पृहणीय असते. मग ते शैक्षणिकक्षेत्र असो वा क्रीडाक्षेत्र. क्रीडाक्षेत्रात पैकीच्या पैकी गुण म्हणजे दहापैकी दहा गुण मिळवून जगप्रसिद्ध झालेली, नादिया कोमनेसी ही रोमानियाची कलात्मक जिम्नॅस्टिकपटू. नादिया पाचवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आहे. भारताच्या एका जिम्नॅस्टिकपटूचे नाव मे महिन्यात चर्चेत येऊन गेले, ते म्हणजे दीपा करमाकर हीचे. अव्वल जिम्नॅस्ट दीपा करमाकरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपा करमाकरनेे ताश्कंद येथील आशियाई महिला ’कलात्मक जिम्नॅस्टिक्स’ स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, ही कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरली आहे.

द बेस्ट ऑफ इंडिया : अमूल, द टेस्ट ऑफ इंडिया हे उत्पादन आज जगप्रसिद्ध झालेले आहे. हे ’अमूल’ नुकत्याच अमेरिका आणि वेस्टइंडीज येथे संयुक्तपणे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाचे सहप्रायोजक होते. क्रिकेट विश्वचषक आणि फॉर्म्युला-वन शर्यती यांच्याशी अमूल सतत संलग्न आहे. ’ऑलिम्पिक 2012’साठी भारतीय संघाचे दुग्धजन्य पदार्थांसाठी अधिकृत प्रायोजकही होते. अमूलचे तत्कालीन अध्यक्ष वर्गीस कुरियन यांनी एका खोडकर लहान मुलीच्या माध्यमातून, अमूलची जाहिरात आणि चालू काळाला अनुसरून असलेल्या समर्पक विचाराची एका वाक्यात मांडणी करण्यासाठी ’अमूल गर्ल’ जगापुढे आणली. ही ’अमूल गर्ल’ जशी प्रसिद्ध आहे, तशीच एक बार्बी डॉल सन 2012 पासून जगाला मिळाली आहे, ती भारतीय जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकरच्या रुपात.

प्रेरणादायक बार्बी डॉल : बाळ जेव्हा मोठे होऊ लागते, त्या वेळेपासून त्या बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाची वाढ होत असते. त्यावेळी आपण त्याला कशाप्रकारची खेळणी देतो, त्यावर अनेकदा त्या बाळाची आवडनिवड ठरत असते. करतानाच आपण योग्य वयातच त्याला मल्लखांब, योगासने, जिम्नॅस्टिक्स यांसारख्या क्रीडाप्रारांची तोंडओळख करून दिली,तर ते प्रथमपासूनच त्यात तरबेज होऊ लागते. बालवयापासून आपल्या मुलामुलींमध्ये जिम्नॅस्टिकचे आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी खेळणी बनवणार्‍या एका अमेरिकेच्या कंपनीने, एक बाहुली अर्थात बार्बी डॉल तयार करून बाजारात आणली. रियो ऑलिम्पिक 2016 साली जगात नावारुपाला आलेल्या, दीपा करमाकर हिने या जगत्विख्यात कंपनीवर भुरळ घातली. ’मेटेल’ नावाच्या अमेरिकन कंपनीने आपली 60वा वर्धापनदिन साजरा करायचे ठरवले होते. त्याप्रसंगी त्यांनी 17 देशांमधून निवडक अशा 20 यशस्वी महिलांची यादी केली आणि त्या 20 जणींच्या ’बार्बी डॉल’ तयार केल्या. युवापिढीला त्या बाहुल्यांपासून प्रेरणा मिळावी, हा त्यांचा मुख्य उद्देश. आपल्यादृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे, आपल्या दीपा करमाकरचे नाव त्या 20 महिलांमध्ये निवडले गेले. तीच दीपा करमाकर जिने 2014च्या राष्ट्रमंडळ खेळात कांस्यपदक पटकावले होते, रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये तिचे कांस्यपदक केवळ एका गुणाने हुकले होते. भारताकडून ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक्समधे सहभाग घेणारी पहिली भारतीय युवती, 2015च्या आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कांस्यपदक विजेती होती.

पदार्पण बार्बी डॉलचे : विविध खेळ व खेळणी तयार करणार्‍या क्षेत्रातील व्यावसायिकांची, एक खेळणीजत्रा दि. 9 मार्च 1959 रोजी न्यूयॉर्क शहरात भरली होती. आज जगप्रसिद्ध असलेल्या बार्बी डॉलचे प्रथम पदार्पण त्या जत्रेतच झाले होते. न्यूयॉर्क येथील खेळण्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करणार्‍या मॅटेल इन्कॉर्पोरेशनच्या रुथ हॅण्डलर स्त्रीच्या संकल्पनेतून बार्बी डॉल उदयास आली. त्या रुथ हॅण्डलला जर्मनच्या ’लिली’नामक बाहुलीपासून बार्बीची प्रेरणा मिळाली. नंतर लगेचच बार्बी डॉलचा विकास अमेरिकेत सुरू होत, ती बाहुली जगप्रसिद्ध झाली.

गुणग्राहक नादिया : येथे जिम्नॅस्टिकमधला एक चमकता तारा तिच्या स्वरुपात बघून मला आनंद होत आहे, असे नादियाने दीपाच्या ऑलिम्पिकमधील यशाबद्दल एका मुलाखतीत म्हटले होते. भारतीयांची जिम्नॅस्टिककडे असलेली ओढ, आणि दीपा करमाकरबद्दल व्यक्त केलेले आपले मत पाहिले की समजते की, जिम्नॅस्टिकची खरी किंमत तिला आहे. आणि नादियासारख्या जिम्नॅस्टिकसम्राज्ञीकडून कौतुक होणे हा देखील दीपाचा एक बहुमानच समजायला हवा. ऑगस्ट 2019मध्ये भारतील दोन शाळकरी विद्यार्थ्यांची एक चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये दोन विद्यार्थी जिम्नॅस्टिकसारख्या कोलांटीउड्यांची कसरत करत होते. कसरतींचे ते दृष्य पाहून, नादियादेखील प्रभावित झाली होती. तेव्हा तिने ’हे अद्भुत आहे’ असे म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे, 2019 ते 2021 या काळात मोदी सरकारमधील तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्रिपद सांभाळलेल्या, किरेन रिजिजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करत, भारतीय मुलांमध्ये खूप प्रतिभा असल्याचे सांगितले होते. तसेच नादिया कोमेन्सीने ट्विट केल्याचे पाहून मला आनंद झाला असल्याचेदेखील त्यांनी म्हटले होते.

आपल्या बालकांचे आदर्श!
आपल्याकडे शालेय, राज्य एवढेच नव्हे, तर दीपासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये असे कित्येक जिम्नॅस्ट आढळतील. अनेक पालक आपल्या पाल्याला जिम्नॅस्टिकपटू बनवण्याचे स्वप्न बघत असतील. त्याचप्रमाणे डोंबार्‍यांच्या खेळात चालणार्‍या कसरतींच्या उलट्यासुलट्या कोलांटीउड्या, शरीर वाकवून, वळवून आणि मुडपून दाखविणे, अशा कसरती करणारे, पोट भरण्यासाठी आपले नैपुण्य दाखवत टाळ्या मिळवणारे, कित्येकजण भारतात आहेत, पण त्यांची उडी अजूनही ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसत नाही. हे भारतीय क्रीडाप्रेमींनी लक्षात घेतले पाहिजे. यांना संधी मिळाली तर समाजातील सर्व थरांतून उद्या दीपा, नादियासारखे तारे उगवताना दिसले, तर किती छान होईल ना! त्यासाठी फक्त आपल्या मुलांपुढे तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, तसेच शेफाली वर्मा, स्मृती मंधाना यांच्या आदर्शांप्रमाणेच, ‘दीपा द बार्बी डॉल’सारखेही आदर्श आपण ठेवले, तर ती मुले देखील नादियासारखे व तनिषा सागर बोरमणीकरसारखे पैकीच्या पैकी गुण नक्की मिळवतील हे पक्के.
इति!

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
९४२२०३१७०४
Powered By Sangraha 9.0