मुंबईसह राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण; निकालावर असणार नजरा!

विधानसभा क्षेत्रानिहाय १४ टेबल; मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूस सक्त मनाई

    03-Jun-2024
Total Views |
maharashtra voting result


मुंबई :    अवघ्या देशाला उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवार, दि. ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबईसह राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.

राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून, प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी १४ टेबल व सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.


३०० मीटर परिसरात मनाई आदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्राच्या परिसरात ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून, अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.


महाराष्ट्र भाजपकडून जल्लोषाची तयारी

सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ४०० च्या जवळपास जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने महाजल्लोषाची तयारी केली आहे. मंगळवार, दि. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालय (नरिमन पॉईंट) येथे विजयी महाजल्लोष साजरा केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यात सहभागी होतील.