दोडामार्ग (विशेष प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी जागेतील नैसर्गिक वनांचा र्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नैसर्गिक वनांचा र्हास रोखणे, खासगी जागेवर धनेश पक्ष्यांसाठी पोषक असणार्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खासगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचा ऊहापोह रविवार, दि. 2 जून रोजी दोडामार्गमध्ये पार पडलेल्या ‘धनेशमित्र संमेलना’त करण्यात आला. ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’च्या माध्यमातून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महा एमटीबी’ या संमेलनामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोडामार्ग तालुक्यातील वानोशी फॉरेस्ट होम स्टे येथे रविवार, दि. 2 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत ‘धनेशमित्र संमेलन’ पार पडले. संमेलनाची सुरुवात ‘महा एमटीबी’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाचे सादरीकरणाने झाली. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर उपस्थितांशी संवाद साधला.
वानोशी फॉरेस्ट होम स्टेचे प्रवीण देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, ‘देवराई फाऊंडेशन’चे रघुनाथ ढोले, ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’चे वन्यजीव संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर, सृष्टिज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे डॉ. शार्दुल केळकर हे उपस्थित होते. “धनेश पक्षी संवर्धनाच्या कामासाठी अशा पद्धतीचे संमेलन होणे आवश्यक असून त्यामधून वनविभागालादेखील संवर्धनाची दिशा मिळते,” असे प्रतिपादन उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. उद्घाटनानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे प्रतीक मोरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील धनेश पक्षी संवर्धनाची माहिती दिली. डॉ. रोहित नानिवडेकर यांनी भारतातील धनेश पक्षी संवर्धनाचा ऊहापोह केला. त्यानंतर धनेश पक्षी संशोधक पूजा पवार यांनी पश्चिम घाटातील धनेश पक्षी संशोधनाचा आढावा मांडला.
खुल्या स्वरुपाच्या चर्चासत्रामधून सिंधुदुर्गातील स्थानिक हे धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाला असलेल्या आव्हानांविषयी बोलते झाले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. “धनेशाच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी खासगी जागा मालकांनी पुढे येण्याची गरज असून त्याठिकाणी आपण वनीकरणाचा प्रयोग करून अधिवासाचे पुनरूज्जीवन करू शकतो,” असे मत नानिवडेकर यांनी सत्राअंती मांडले. धनेश पक्ष्यांना असणार्या धोक्यांवर मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, यावर खुल्या स्वरुपातील चर्चासत्र पार पडले. या सत्राअंती प्रतीक मोरे म्हणाले की, “धनेश पक्षी संवर्धनासाठी काही राखीव वने ही ‘संवर्धन राखीव’ किंवा ‘कम्युनिटी रिझर्व्ह’ म्हणून संवर्धित करणे गरजेचे आहे.” त्यानुसार स्थानिकांनी मिळून अशा जागांची यादी तयार केली.
सत्रादरम्यानधनेश पक्ष्यांविषयी वेगवेगळे खेळ पार पडले. धनेश संवर्धनाविषयी या संमेलनामधून नोंदवलेले प्रमुख मुद्दे हे सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत. या संमेलनाला ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ आणि‘ऑन दि एज फाऊंडेशन’ यांनी अर्थसाहाय्य पुरवले. तर सृष्टिज्ञान संस्था, ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’, दै. ‘मुंबई तरुण भारत’, ‘वनश्री फाऊंडेशन’, वानोशी फॉरेस्ट होम स्टे, ‘देवराई फाऊंडेशन’ यांचे सहकार्य मिळाले.
“धनेशमित्र पुरस्कार विजेते सिंधुदुर्ग जिल्ह्यात धनेश पक्षी आणि इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणार्या निसर्गमित्रांचा धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘वनश्री फाऊंडेशन’, प्रवीण सातोसकर, प्रवीण देसाई, विशाल सडेकर, पराग रांगणेकर, भाग्यश्री परब, महादेव भिसे, गजानन शेटये, राहुल ठाकूर, वाईल्डवन तिलारी, मिलिंद पाटील यांचा सन्मान करण्यात आला.”