योगिक-नियम (लेखांक -७)

    03-Jun-2024
Total Views |
personal hygiene

योग करणार्‍या व्यक्तीला योगातील अष्टांगांपैकी पहिले दोन अंग म्हणजे यम, नियम यांचा अभ्यास करूनच पुढे आसन, प्राणायामाकडे जावं लागतं, अन्यथा घाण बाटली स्वच्छ न धुता त्यात औषध भरले असता जसं ते औषध घेणार्‍याला उपायाऐवजी अपाय होईल, तसं यम, नियम न अंगीकारता आसन, प्राणायामावर उडी मारणार्‍याचं होऊ शकतं. म्हणूनच म्हणतात, योगशास्त्र हे सोपं नाही. ते अभ्यासून आपलं समग्र व्यक्तिमत्त्व बदलतं, समग्र जीवनावर त्याचा उत्तम परिणाम होतो. व्यक्तिविकासातूनच समाजाचा विकास साधतो. म्हणून, योगशास्त्राचा खर्‍या अर्थाने प्रचार-प्रसार व्हावा, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचकांनी स्वतः वाचून, अंगीकारून ते इतरांना प्रसारित करावे. या कार्यात सहभागी व्हावे, ही विनंती.

या लेखापासून आपण योगशास्त्राच्या दुसर्‍या अंगाचा म्हणजेच ‘नियम’ या अंगाचा अभ्यास करणार आहोत, जे वैयक्तिक शिस्तीसाठी आहे. यम हे पहिले अंग हे सामाजिक शिस्तीसाठी होतं, त्याचा आपला सविस्तर अभ्यास करून झाला. यम, नियम पाळणार्‍याला मी दर्शन देतो, असं भगवंत ‘भागवता’च्या एकादश स्कंधात म्हणतात. त्याची एकनाथांनी केलेली टीका अशी :हेचि पै गा यम नेम। पुरुष उपाशी निष्काम। तैं त्यासि माझे निजधाम। अतिसुगम। निजप्राप्ती॥अ.19- श्लोक 415॥ एकनाथी भागवत.एवढे यम-नियमांचे महत्त्व आहे. नियम म्हणजे रुल, शिस्त असा अर्थ घ्यावा. योगशास्त्रात सर्वसामान्यपणे पाच नियम दिलेले आहेत. ते असे - शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान. त्यापैकी शौच या पहिल्या नियमाचा अभ्यास आपण या लेखात करू.
 
शौच म्हणजे शुद्धता, स्वच्छता. उद्देशाची, शरीराची, मनाची, वस्तूंची वा साधनांची. आपण म्हणाल उद्देशाची म्हणजे कशाची? तर, आपला आपल्या कर्माप्रतिचा उद्देश. तो उदात्त, कल्याणकारी, आपलं तसंच इतरांचं कल्याण करणारा असावा. म्हणून, संत तुकाराम महाराज सांगतात, ‘शुद्ध बिजा पोटी । फळे रसाळ गोमटी॥’ इथे बिजाची उपमा ही कर्माच्या उद्देशाला दिलेली आहे. म्हणून, आपण कर्म सुरू करण्यापूर्वी आपला उद्देश तपासावा. तो शुद्ध आहे की नाही? वाईट उद्देशाने केलेल्या कर्माची फळं वाईटच येणार. अशा फळांना आपलं धर्मशास्त्र ‘पाप’ असे संबोधतं. चांगल्या उद्देशाने केलेल्या कर्माची फळं ही पुण्यकारक असतात. त्यांचे उद्देशानुसार भोग किंवा उपभोग हे ठरलेले आहेत. प्रकृतीच्या नियमानुसार ती ज्याची त्यालाच भोगावी किंवा उपभोगावी लागतात, तिथे चुकूनही भागीदार नसतो.

भोग चुकवायचा असल्यास प्रायश्चित्त मात्र आहे. ते शास्त्रसंमत असावे, आपल्या सोयीचे नाही. त्याविषयी ऊहापोह आपण पुढच्या लेखात करू. शरीरशौच म्हणजे शरीराची शुद्धता. शरीर शुद्ध ठेवणे. आपण त्यासाठी रोज स्नान करतो. परिस्थितीनुसार स्नानाचे सहा प्रकार आहेत. पहिलं पाण्याने स्नान. दुसरं भस्मस्नान, तिसरं मंत्रस्नान, चौथे गोधूल/ गोमूत्र स्नान, पाचवं वायुस्नान आणि सहावं मानसस्नान. परिस्थितीनुसार जे शक्य आहे ते स्नान करून शरीर शुद्ध ठेवावे. ही बाह्यशुद्धता झाली. आंतरिक शुद्धीचं काय? त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने व प्राणायाम करावे लागतात. त्यांच्याकरिता स्वतंत्र अंग आहेत, तिथे त्यांचा अभ्यास होईल.तिसरा मनाचा शौच म्हणजे मन शुद्ध ठेवणे. मन शुद्ध ठेवणे म्हणजे नेमके काय? मन काही बाहेर काढून धुता येत नाही. मन ही आपल्याला मिळालेली शक्ती आहे. तिचा उपयोग सकारात्मकतेने करावा. त्यासाठी मनावर संस्कार करावेत. त्यासाठी उत्तम वाचन, उत्तम संगती, प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास करावा लागतो.

आपले संत साहित्य क्रमाने दासबोध, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी हे अभ्यासावे लागतात. मनाचे श्लोक वाचून मनाला जेवढं वळण लागतं, तेवढं क्वचितच इतर वाचनाने लागतं. मनावर खरा संस्कार आपलं कर्म करतं. ग्रंथ अभ्यासून आपला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि कर्म सुधारले जाते. असे सुधारित कर्माचे संस्कार मनावर होऊन मनःशुद्धी साधते, अन्यथा, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर व माया हे प्रकृतीचे षड्रिपू हे प्रत्येकाकडे आहेतच. त्यांचे फायदे आहेत आणि तोटेपण आहेत. त्यांचं व्यवस्थापन संस्कारित मन उत्तमरित्या करतं. आपल्या व्यक्तिमत्त्वात विकास होत राहतो. म्हणून, मनशौच हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. चौथा वस्तूंचा, साधनांचा शौच. जीवनावश्यक वस्तू कशा अर्जित केल्या. वैध मार्गाने की अवैध मार्गाने. आपण मागील लेखांमध्ये बघितलं, हे पूर्ण विश्व स्पंदनांवर, कंपनांवर चालतं. ज्या वस्तू ज्या अवैध मार्गाने मिळवल्या आहेत, त्या नकारात्मक कंपनंच सोडत राहणार. त्यामुळे आपल्या मनात कायम भय वास करून राहणार. भय हे सर्व रोगांना, शारीरिक तथा मानसिक, आमंत्रण देत. सूक्ष्म रितीने विचार केला तर आंतरिक भय हेच रोगांचं मूळ कारण असतं. अवैध मार्गाने संपत्ती मिळविली त्याचंं भय. हडेलहप्पी करून, इतरांना फसवून संपत्ती मिळविली त्याचं भय. असे लोक खरं बोलू शकत नाहीत.

अशांच्या चेहर्‍यावर कधी आनंद झळकत नाही. अशांच्या घरात चैनीच्या वस्तू असतात, पण चेहर्‍यावर कायम उदासी. अशा घरात केव्हाही भकास वातावरण असतं. जे लोक कंपनांचा प्रकार जाणतात, ते अशा घरात जास्त वेळ राहू शकत नाहीत. अशा वस्तू, अशी साधने योग साधनेत व्यत्यय आणतात. जे लोक योग शिकू इच्छितात, ते, खासगीत विचारतात सर! अज्ञानवश हमने तो, ऐसी कमाई कर ली! अब क्या करे? त्यांच्यासाठी उपाय आहे. त्या वस्तू ती साधनं जवळ ठेवू नका. दान करून टाका. ते शक्य नसेल तर त्या वस्तूंच्या, साधनांच्या किमतीएवढं दान करा. तेही शक्य नाही तर किमतीच्या कमीतकमी सव्वासहा टक्के दान करावे, म्हणजे तो दोष निघून जाईल. परत असे करू नका. काही व्यापारी देवाला धंद्यात पार्टनर ठेवतात. वर्षअखेर हिशेब झाले की तेवढी रक्कम देवाला वाहतात व पुनश्च जे करू नये तेच करतात, जणू काही देवाने खोटे व्यवहार करण्याचा परवाना दिला. अशाने कर्मदोष जात नाहीत. ते आहे त्याच स्तरावर राहतात. त्यांचा विकास होत नाही.
 
 
डॉ.गजनान जोग 
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)