आंबा फळांचा राजा (भाग २)

03 Jun 2024 19:59:19
Mango

आंबा... मग तो कच्चा असो, पक्का, त्याचा ताजा रस, आटवून आंब्याचा रस वाळवून अशा विविध पद्धतीने खाल्ला जातो. पण, आंब्याच्या या प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म काहीसे वेगवेगळे आहेत. मागील लेखात यापैकी काहींची माहिती आपण करुन घेतली. आता उर्वरित गुणधर्मांची माहिती घेऊया.

पिकलेला आंबा चवीला गोड व त्याची अऋढएठ-ढअडढए किंचित तुरट असते. हा आंबा शरीरात थोडी स्निग्धांशता निर्माण करतो, यासाठी उपकारक आहे. त्याचबरोबर शुक्राचेही प्रमाण वाढविण्यास उपयोगी आहे, वृष्य आहे. पिकलेल्या आंब्याने शरीरात उत्तम कफाची वाढ होते. पाचकाग्नी सुधारतो व वाढतो. थंड असल्याने पित्त वाढवत नाही. या आंब्याने बलप्राप्ती होते, आनंद व समाधान मिळते. पाचकाग्नी सुधारत असल्याने पचायला जड होत नाही. वाताचे शमन करतो आणि त्वचेचा रंग व पोत सुधारतो. झाडावरच जर आंबा पिकला आणि मग तो खाल्ला तर तो पचायला थोडा जड होतो. चवीला आंबड-गोड असतो. वाताचे शमन करतो आणि किंचित पित्त वाढवतो. जो आंबा कृत्रिमरित्या पिकविला जातो, तो चवीला अधिक गोड व थोडा कमी आंबट असतो आणि पित्ताचे शमन करण्यास उपयोगी असतो, असा आंबा खाल्ल्याने ताकद (बल) आणि वीर्य वाढते. पचायला हलका होतो, थंड असतो, सारक असतो, वात आणि पित्ताचे हरण करतो. शरीराचे तर्पण, पोषण आणि बृंहण अधिक चांगल्या पद्धतीने करतो. असा आंबा खाल्ल्यास समाधान आणि तृप्ती अधिक जाणवते.

कफाची उत्तम वाढ करतो. आंब्याच्या सुकविलेल्या फोडीचे काप पचायला जड असतात. पण, तोंडाची चव गेलेली असल्यास चव आणि अ‍ॅपेटाईट पुन्हा वाढविण्यास उपयोगी आहे. चवीला गोड, हळूहळू पचणारे आणि बल वाढविणारे, बृंहण-पोषण करणारे आहे. थंड आहे आणि वाताचे शमन करणारे आहे. आंबा आणि दूध हे मिश्रण वात आणि पित्तहर आहे, वृष्य आहे, चव उत्पन्न करणारे आहे. वर्ण, कांती सुधरविण्यास उपयोगी आहे. थंड आहे आणि पचायला जड आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार फळ आणि दूध एकत्र खाऊ नये. या नियमाला एकच अपवाद आहे, तो म्हणजे पिकलेल्या आंब्याचा रस आणि दूध होय. कैरी किंचित तुरट आणि आंबट असते. रुचकर (अन्नात रुची उत्पन्न करते) वात आणि पित्त वाढविते, शरीरात रुक्षता निर्माण करते. व्रिदोह व रक्ताची वृद्धी (विकृत त्रिदोष आणि रक्त) करणारे आहे. कैरीची सालं काढून त्याचे छोटे छोटे काप करावेत आणि वाळवावेत. हे काप चवीला आंबट-गोड-तुरट असे लागतात. मळाचा खडा होत असल्यास तो फोडण्यास मदत करणारे आहे तसेच कफाचे व वाताचे शमन करते.
 
जसे कैरी व आंब्याचे शरीरात विविध कार्ये घडतात, तसेच आंब्याच्या फुलांचाही उपयोग आहे. जुलाब होत असल्यास रक्त रक्तधातूच्या विकारांमध्ये व कफ आणि पित्ताच्या त्रासांना कमी करणारे आहे. प्रमेहातही उपयोगी आहे. थंड आहे. अन्नातील रुची वाढविणारे आहे. याने मलबद्धता होते आणि वात वाढविणारे आहे. आंबा म्हटला की, तो प्रमाणात खाणे होत नाही. बरेचदा अति प्रमाणात (विविध प्रकारे) खाल्ला जातो. आंबा प्रमाणापेक्षा अधिक खाल्ला गेला तर त्याचा अतियोग होतो. अतियोगाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. पचनशक्ती मंदावते. अधूनमधून ताप येतो, रक्ताचे विविध त्रास उत्पन्न होतात, डोळ्यांच्या तक्रारी उत्पन्न होतात. पोट फुगणे व उदर या व्याधी होऊ शकतात. हे सगळे आंबट चवीच्या आंब्याने होते. डोळ्यांनाही अतिआंबट चव पथ्यकर नाही. ही लक्षणे जर उत्पन्न झाली तर सुंठ घालून पाणी उकळावे व ते थोडे थोडे प्यावे. जिरं आणि काळं मीठ (सौवर्चल लवण असे आयुर्वेदीय नाव आहे) थोडे घ्यावे. यामुळे अति प्रमाणात खाल्लेला आंबा बाधत नाही आणि बाधला तरी या उपायांनी आराम पडतो.
 
साठं (आंब्याचा रस काढून, तो आटवून, उन्हात वाळविणे) म्हणजेच आंब्याची पोळी याने तहान शमते, उलट्या होत असल्यास ते थांबविण्यास मदत करते. वात आणि पित्ताचे शमन करते. थोडं सारक असल्याने ज्यांचा कोठा नाजूक आहे, त्यांना जुलाब होऊ शकतात. चवीला उत्तम, अन्नात रुची उत्पन्न करण्यात उपयोगी आहे आणि उन्हात वाळविण्याने पचायला हलके होते. आंब्याचा उपयोग म्हणजे फक्त आंब्याच्या फळाचा उपयोग नव्हे, तर आंब्याची कोयदेखील खूप उपयोगी आहे. अपचित अन्न आणि त्यामुळे होत असलेले जुलाब व पोटदुखीवर आंब्याची कोय दह्यात वाढून खायला द्यावी. आंब्याची बाट वाळवावी, ती सुकल्यावर फोडावी आणि त्याच्या आतील गर म्हणजे कोय होय. ही नुसती खाल्ली तरी औषधी आहे आणि भाजून खाल्ल्यानेही औषधी उपयोग आहे. लहान मुलांना विशेषत: आणि मोठ्यांमध्ये ही पोटास जर जंत झाले असतील, तर आंब्याच्या कोयीचे चूर्ण करून खायला द्यावे. गर्भिणीला जर जुलाब होत असले तर आंब्याची कोय भाजावी आणि ती खायला द्यावी. तसेच श्वेतप्रदर (अंगावरून पांढरे जाणे) मूळव्याध आणि रक्ती मूळव्याधीच्या त्रासांवर आंब्याची कोय मधातून घेतल्यास आराम पडतो.

उन्हाळ्यात बरेचदा नाकातून रक्त येते. अशा वेळेस आंब्याच्या कोयीचा रस काढून तो नाकात पिळावा. हा रस वस्रगाळ असावा. जुलाबावाटे जर रक्त पडत असेल, तर आंब्याची कोय ताकात वाटून खायला द्यावी. तांदळाच्या धुवणांत कोय वाटून दिल्यासही आराम पडतो. जर तांदळाला कोणतेही रासायनिक द्रव्य लावले नसले तरच हा प्रयोग करावा, अन्यथा नाही. आंब्याची साल दुधात वाटून मधातून चाटण्यास द्यावी, यानेही रक्त व जुलाब (रक्तातिसार) थांबण्यास फायदा होतो. उलटीवाटे रक्त निघाले असल्यास, आंब्याच्या कोयीचा रस नाकात पिळावा. डोक्यात चिकट कोंडा (ऊअछऊठणऋऋ), फोड आणि वेदना तसेच त्यातून चिकट स्राव येत असल्यास आंब्याची कोय आणि बाळ हरडा यांचे चूर्ण करावे. ते दुधात कालवावे आणि डोक्यावर त्याचा लेप करावा. कोयीप्रमाणेच आंब्याची पाने, आंब्याच्या खोडाचे साल, चिकापासून तयार झालेल्या डिंकाचाही औषधी उपयोग आहे.

रांजणवाडी झाली असल्यास आंब्याचा डिंक किंवा पान तोडल्यावर येणारा चिक त्या रांजणवाडीवर लावावा. त्याने आराम पडतो. थंडीने पाय उकलतात/फुटतात. त्यालाही हा डिंक लावल्यास आराम पडतो. जुलाबावरही या डिंकाचा/राळेचा वापर (त्याचे चूर्ण करून) साखर व तूप घालून खाण्यास द्यावे. आराम पडतो. आंब्याच्या पानांचाही वापर विविध त्रासांमध्ये करता येतो. आवाज बसला असल्यास आंब्याच्या पानांचा काढा बनवावा (एक चतुर्थांश होईपर्यंत पाणी आटवावे) तो पिताना त्यात मध घालून प्यावा. आवाजाच्या तक्रारींवर उपयोग आहे. जुलाबावाटे रक्त पडत असल्यास, आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत, त्याचा रस काढावा आणि हा रस मध, तूप आणि दूध घालून प्यावे. रक्ती जुलाब थांबण्यास फायदा होतो. मूळव्याधीचा त्रास होत असल्यास, आंब्याची पाने सुकवावी, त्याचा चुरा करावा आणि त्याला पेटवावे, याचा धूर मूळव्याधीच्या कोंबावर द्यावा. त्याने ठणका कमी होण्यास मदत होते.

आंब्याच्या खोडाच्या सालीचा ही जुलाबावर व अन्य आजारांवर उपयोग आहे. जुलाब आणि जळजळ होत असल्यास, आंब्याच्या खोडाचे साल (आंतरसाल)दह्यात वाटावे आणि खायला द्यावे. याने आगही शमते आणि जुलाबही थांबतात. सर्व प्रकारच्या उष्णतेच्या तक्रारींवर आंब्याची आंतरसाल, उंबराच्या मुळावरील साल आणि वडाच्या पारंब्यांचा रस काढून त्यात जिरे-खडीसाखर घालून प्यावे. बरे वाटते. जुलाबावाटे रक्त पडत असल्यास, आंब्याची आंतरसाल दुधात वाटून मधातून द्यावी. आव पडत असल्यास आंबा, आंबाडा आणि जांभूळ यापासून दाट काढा (डजणझ) बनवावे. यासाठी तिन्ही झाडांची सालं पाण्यात उकळावीत. पाणी निम्मे आटले की यात तांदूळ शिजवावा. या दाट सुपाला ‘आम्लादियवायू’ म्हणतात. याने आंब्यावर उत्तम परिणाम होतो. रक्तातिसाराचा त्रास असल्यास आंबा, जांभूळ आणि अर्जुन या झाडांच्या साली वाळवून चूर्ण करावे आणि पाण्यात रात्रभर भिजवावे. वस्रगाळ करून मध घालून प्यावे. याने जुलाबावाटे रक्त पडणे थांबते. हे सर्व प्राथमिक उपाय आहेत. तरी वैद्यांच्या सल्ल्यानेच करावेत. शरीरातील दोषांची स्थिती, प्रकृती, ऋतुमान इ. विविध गोष्टींचा विचार औषधोपचारांपूर्वी होणे महत्त्वाचे असते.


- वैद्य कीर्ती देव


Powered By Sangraha 9.0