पाऊलखुणा कोळसुंदा संवर्धनाच्या

    03-Jun-2024
Total Views |
wilddog conference
कोकणातील काही गावांमध्ये दबक्या पावलांनी फिरणारे कोळसुंदे म्हणजे रानकुत्र्यांचे कळप दृष्टिपथात येऊ लागले, मात्र अभ्यास, माहिती आणि संशोधनाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित राहिले आहेत. वाघ, बिबट्या यासारख्या मांसभक्षी प्राण्यांच्या यादीत येणार्‍या संकटग्रस्त रानकुत्र्यांना कोकणात स्थानिक भाषेत ‘कोळसुंदे’, ‘कोळशिंदे’, ‘कोळिस’, ‘सोनकुत्रा’, ‘देवाचा कुत्रा’ अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील याच रानकुत्र्यांच्या संवर्धनासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ ने रविवार, दि. 26 मे रोजी देवरुख येथे ‘रानकुत्रा संवर्धन कृती आराखडा बैठक’ आयोजित केली होती. या कार्यक्रमाला ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी-इंडिया’ आणि ‘सृजन सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर- देवरुख’ हे प्रायोजक म्हणून लाभले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या ‘सृजन सायन्स इनोव्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ येथे पार पडलेल्या या बैठकीसाठी वनअधिकारी, रानकुत्रा संशोधक, ग्रामस्थ, वन्यजीव निरीक्षक तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. अभ्यास आणि संशोधनाच्या दृष्टीने मागे राहिलेल्या रानकुत्र्यांविषयी स्थानिकांमध्येही फारशी जनजागृती नाही. त्यामुळेच अनेकदा त्यांना कोल्हे म्हणून संबोधले जाते. यासाठीच रानकुत्र्यांविषयी प्रबोधन व्हावे तसेच त्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाबरोबरच स्थानिक आणि संशोधकांनीही एकत्र यावे, या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संशोधकांची सादरीकरणे, स्थानिकांशी संवाद, गटचर्चा अशा विविध टप्प्यांमधून रानकुत्र्यांविषयी समजून घेतल्यानंतर तयार करण्यात आलेला कृती आराखडा अहवालावर अंमलबजावणी करण्याची ग्वाही वनाधिकार्‍यांनी दिली. या बैठकीला महाराष्ट्र वनविभागाबरोबरच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री संकल्प सोसायटी, सह्याद्री निसर्गमित्र, सृष्टिज्ञान, निसर्गसोबती, वनश्री फाऊंडेशन, नॅचरलिस्ट फाऊंडेशन या सहयोगी संस्था लाभल्या. स्थानिकांची निरीक्षणे, वन्यजीव निरीक्षकांच्या नोंदी, सादरीकरणे, संशोधकांचं म्हणणं, गटचर्चा अशा विविध टप्प्यांत दि. 26 मे रोजी दिवसभर रानकुत्रा संवर्धनासाठी केलेल्या मंथनाचा हा विस्तृत आढावा...
wilddog conference
"आपल्या सगळ्यांच्या मनात एकच भाव आहे आणि आज त्यामुळेच आपण सर्व एकत्र आहोत. केवळ जनजागृतीच्या स्तरावरच मर्यादित न राहता संवर्धनाच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत, यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आजच्या बैठकीमधून वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन काम करणारी माणसं आणि प्रबोधनपर काम करणारी माणसं अशा दोन्ही स्तरांवरून काम व्हायला हवं."
- किरण शेलार
संपादक, दै. मुंबई तरुण भारत


"रानकुत्र्यांवर आधारित संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हा विषयच आमच्यापैकी अनेकांसाठी नावीन्यपूर्ण होता. सध्या वन्यजीव क्षेत्रातील काम पाहून असं वाटतंय की मनुष्य संवर्धन सोडलं तर आपल्याला सगळ्याच प्रजातींचं संरक्षण करण्याची आज गरज आहे. कृती आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर शासन स्तरावर काम होणं जास्त गरजेचं वाटतं."
- सदानंद भागवत
अध्यक्ष, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ


"वाघ, बिबट्या या मोठ्या प्रजातींवर चांगल्यापैकी संशोधन झाले आहे, पण रानकुत्र्यांसारख्या काही प्रजाती मात्र दुर्लक्षितच राहिल्या आहेत. या माध्यमातून त्याला सुरुवात होतेय, ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. आजच्या या बैठकीमध्ये ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी ठरतील तसेच कृती आराखड्यावर आधारित उपाययोजनांची अंमलबजावणी वनविभागामार्फत आपण नक्की करू, अशी ग्वाही देतो."
- डॉ. व्ही. क्लेमेंट बेन
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक - वन्यजीव (पश्चिम)


"रानकुत्रा हा सह-शिकारी (उे-झीशवरीेीं) प्राणी आहे. वाघासारख्या की-स्पिशीजचे संरक्षण केले म्हणजे सर्व प्राणी संरक्षित झाले, असे असले तरीही वन्यजीव कायद्याच्या शेड्युल 1 मध्ये येणार्‍या रानकुत्र्यांनाही संरक्षणाची तितकीच गरज आहे. तसेच संशोधकांनी मांडलेले मुद्दे, जसे की: भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, मिटिगेशन मेजर्सचा वापर, अधिवास संवर्धन अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर अंमल करण्याचा वनविभाग नक्की प्रयत्न करेल."
- मणिकंदन रामानुजम
मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर प्रादेशिक


"सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सद्यःस्थितीत एकूण पाच-सात रानकुत्र्यांचे कळप आहेत. रानकुत्र्यांचे नैसर्गिक खाद्य असणारे तृणभक्षी प्राणी जसे की सांबार, असे इतर प्राणी लक्षात घेत त्यांची संख्या वाढविण्यावर भर द्यायला हवा. कोणतीही गोष्ट वाचविण्याची इच्छा म्हणजे संवर्धन ही संवर्धनाची सोपी व्याख्या लक्षात घेऊन काम केलं तर नक्कीच याचे यश मिळेल."
- उत्तम सावंत
उपवनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प


"रानकुत्र्यांच्या संवर्धनासाठी हा आराखडा फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्या भागामध्ये जंगल नाही पण वन्यजीव आहेत, तिथे आपले काम अधिक वाढणार आहे. त्यामुळेच या आराखड्याची अंमलबजावणी होण्यासाठी मी प्रयत्न करेन. किनारपट्टीच्या भागामध्ये जिथे जनावरांवर हल्ले होत आहेत, तिथे कॅमेरा ट्रॅपिंग करणं गरजेचं आहे."
- एस. नवकिशोर रेड्डी
उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग


"संशोधनावर आधारित ही सादरीकरणे पाहून इथेच न थांबता संशोधक, वनविभाग, स्थानिकांनी एकत्र येऊन हे काम करायला हवं, असं वाटतं. रत्नागिरी जिल्ह्यातही कॅमेरा ट्रॅपिंग, मॅपिंग करून रानकुत्र्यांविषयी माहिती गोळा करता येईल. अनेक ठिकाणी झालेल्या रानकुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांची नोंद आमच्याकडे आहे, त्या त्या ठिकाणांवर जनजागृती सत्र आयोजित करायला हवीत."
- गिरिजा देसाई
विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी



wilddog conference

"Collaboration is always better than competition त्यामुळेच इतक्या संस्था आणि लोक एकत्र येऊन एकमेकांशी स्पर्धा न करता साहाय्य करत, एका दुर्लक्षित प्रजातीसाठी काम करत आहेत, ही खरंच अभिनंदनीय बाब आहे. आजच्या सगळ्या चर्चेमधून मिळालेली माहिती ही फक्त कागदोपत्रीच न राहता त्यावर कृती नक्कीच घडेल, अशी खात्री वाटते."
- निकीत सुर्वे
वन्यजीव संशोधक, वाईल्डलाईफ कॉन्झव्हेशन सोसायटी - इंडिया


"चिपळूणच्या कुंभार्ली घाट आणि परिसरातील रानकुत्र्यांचा अधिवास हा प्रामुख्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेला आहे. या भागात रानकुत्र्यांचा अधिवास हा कायमस्वरूपी आहे. रानकुत्र्यांच्या कळपांची नोंद आम्ही या ठिकाणी केली असून कुंभार्ली घाटातील वनवासीपाड्यांवरील लोकांचे रानकुत्र्यांसोबत असलेले सहसंबंध आश्चर्यकारक आहेत. कुंभार्ली घाटातील वनवासीपाड्यांवर रानकुत्र्यांकडून गुरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा हल्ल्यांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही वन विभागाशी समन्वय साधतो."
- सोनल प्रभूलकर, वन्यजीव संशोधक, चिपळूण


"सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गामधील रानकुत्र्यांच्या अधिवासाच्या विस्ताराची नोंद आम्ही केली आहे. गेल्या 10 वर्षांत या विस्तारात 80 टक्क्यांनी वाढ झाली. आम्ही केलेल्या नोंदींनुसार राधानगरी ते तिलारी या दरम्यानच्या वन्यजीव भ्रमणमार्गामध्ये रानकुत्र्यांचा पाच ते सहा कळपांचा अधिवास आहे. खासगी जागेवरील जंगलतोड हा येथील वन्यजीव भ्रमणमार्गाला असणारा धोका आहे."
- गिरीश पंजाबी,
वन्यजीव संशोधक - वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्ट


"जोर-जांभळी संवर्धन राखीव वनक्षेत्राचा परिसर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला उत्तर सह्याद्रीशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असून बिबटे, रानकुत्रे, गवे, अस्वल हे एकत्रितपणे अधिवास आणि प्रजनन करत असलेले सह्याद्रीच्या उत्तरेकडचे एकमेव ठिकाण आहे. रानकुत्र्यांचे मानवाशी असलेले सहसंबंध, रानकुत्र्यांचा विविध हंगामातील वावर, संख्येचा अंदाज, रानकुत्र्यांचे स्थलांतर या विषयांवर उत्तर सह्याद्रीमधील परिसरात संशोधन होणे गरजेचे आहे."
-श्रीकर अष्टपुत्रे, वन्यजीव अभ्यासक


"संगमेश्वर तालुक्यात असलेला रानकुत्र्यांचा वावर, तसेच देवरायांमधील अधिवासाविषयी आम्ही सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली असून तालुक्यातील गावांमध्ये रानकुत्र्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणांच्या गावकर्‍यांसोबत आम्ही प्रत्यक्षात नोंदी घेत आहोत. याठिकाणी प्रचितगड ते मार्लेश्वरपर्यंत पसरलेले सह्याद्रीच्या पायथ्याचे जंगल हे रानकुत्र्यांसाठी महत्त्वाचे असून हा भाग संवर्धन राखीव किंवा कॅम्युनिटी रिझर्व्ह म्हणून घोषित करणे गरजेचा आहे."
- प्रतीक मोरे, वन्यजीव निरीक्षक, रत्नागिरी

"गुहागरच्या समुद्रकिनारी आम्ही रानकुत्र्यांच्या नोंदी केल्या असून 2020 साली या नोंदी घेण्यास सुरुवात केली होती. कारण, त्यावेळी गुराखी मंडळींनी गावात लाल कुत्रे आल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षांपासून गुहागरच्या वडद, गुहागर, नरवण, तळवली, आरे या भागांतून रानकुत्रे आणि त्यांच्या पिल्लांच्या आम्ही नोंदी करत असलो तरिही या नोंदी आम्ही कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय करत आहोत. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने रानकुत्र्यांच्या नोंदी कशा कराव्यात, यासंदर्भातील प्रशिक्षणाची आम्हाला नितांत गरज आहे."
- अक्षय खरे, वन्यजीव निरीक्षक, गुहागर
wilddog conference