मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिने मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिलेसह दोन महिलांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला होता. शनिवार दिनांक १ जूनच्या रात्री उशीरा ही घटना घडली. परंतु, नेमकी त्या रात्री काय घडले होते हे सी.सी.टी.व्ही फुटेजवरुन समोर आले असून रवीना खरंच नशेत होती का याचा उलगडा देखील झाला आहे.
तर झालं असं की, रवीना टंडन हिच्यावर एका वृद्ध महिलेसह आणखी दोन महिलांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी रवीना दारूच्या नशेत होती, असा दावा देखील करण्यात आला होता. आधी रवीच्या गाडी चालकाने तिन्ही महिलांवर गाडी चढवली आणि नंतर त्यांना मारहाण केली, असाही दावा करण्यात आला. याशिवाय या मारहाणीत रक्तस्त्राव झाल्याचाही आरोप करण्यात आला.
पण आता घडलेल्या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यात स्पष्टपणे दिसत आहे की, शनिवारी १ जूनच्या रात्री महिलांचा एक गट रवीनाच्या घराबाहेर जमला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या प्रकारे ही घटना दाखवण्यात आली आहे ते चुकीचे आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत आहे की, रवीनाच्या घराबाहेर महिलांचा एक गट आला आणि त्यांनी ड्रायव्हरशी भांडण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रवीना तिच्या ड्रायव्हरच्या बचावासाठी भांडणात मध्ये आली. मात्र, घडलेला प्रकार फार चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.