मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी : द डायमंड बाजार' या सीरिजची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कथानकावर जरी काहींनी टीका केली पण भव्य सेट, आकर्षक कॉस्च्युम, सुंदर गाणी, डायलॉग्समुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडली. आता हीरामंडी या वेब सीरीजचा दुसरा सीझन येणार असल्याची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे.
हीरामंडी या वेब सीरीजचे दुसरे पर्व लवकरच भेटीला येणार असून मुंबईतील कार्टर रोड येथे फ्लॅश मॉब आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ट्रेडिशनल अनारकली गाऊनमध्ये १०० नृत्यांगनांनी सादरीकरण केले. नव्या सीझनबद्दल बोलताना नेटफ्लिक्सच्या मोनिका शेरगिल म्हणाल्या की, "संजय लीला भन्साळी यांनी अशी काही जादू केली की हीरामंडी आपल्यासमोर उभी राहिली. प्रेक्षक सीरिजच्या प्रेमात पडले. मला हे सांगताना आनंद होतोय की हीरामंडी सीझन २मधून आपण पुन्हा भेटणार आहोत."