युरोपीय महासंघातील दुग्ध व्यवसाय

    03-Jun-2024
Total Views |
European Dairy Industry

युरोपीय महासंघाच्या दूध उत्पादनात यंदा घट होईल, अशी शक्यता एका अहवालात वर्तविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध उत्पादन कमी होणार असल्याने, उपलब्ध दुधाचा वापर कोणत्या उत्पादनासाठी करायचा, याची निवड काळजीपूर्वक करावी लागणार आहे. त्यामुळे भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी ही एक नामी संधी ठरु शकते. त्याविषयी सविस्तर...
 
युरोपीय महासंघाच्या दुग्ध उत्पादनात घट होईल, असा अंदाज एका अहवालात नुकताच व्यक्त करण्यात आला आहे. गायींची घटती संख्या आणि कमी उत्पादनामुळे डेअरी उद्योगाला त्याचा फटका बसेल. परिणामी, दूध उत्पादक शेतकरी दुग्धपालन व्यवसाय सुरू ठेवावा का, या विचारात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. युरोपीय महासंघाच्या पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी ज्या उपाययोजना राबवायच्या आहेत, त्यासाठी अतिरिक्त, अनुत्पादक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असून, दुग्ध व्यवसायाच्या नफ्यात आणखी घट होईल, अशीही शक्यता आहे. २०२३च्या तुलनेत दूध वितरण लक्षणीयरित्या कमी होईल, याकडे या अहवालात विशेषत्वाने लक्ष वेधण्यात आले आहे.
 
युरोपीय महासंघातील गायींची संख्या कमी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असून, त्यांचा आढावा घ्यायला हवा. दुधाच्या दरातील चढ-उतार, उत्पादन खर्च तसेच बाजारातील अनिश्चितता यामुळे दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत आहे. नफा कमी झाल्याने, दुग्ध उत्पादक शेतकरी गायींची संख्या कमी करत आहेत किंवा व्यवसाय बंदच करत आहेत. ग्राहकांच्या आवडीनिवडी, आहाराच्या सवयी तसेच पर्यायी उत्पादनांच्या मागणीमधील बदल डेअरी व्यवसायाला मारक ठरत आहे. उत्सर्जन, कचरा व्यवस्थापन आणि जमिनीच्या वापराशी संबंधित कठोर पर्यावरणीय नियम दुग्ध व्यवसायावर परिणाम करणारे ठरले आहेत. चराऊ कुरण तसेच खाद्य उत्पादनासाठी योग्य जमिनीची मर्यादित उपलब्धताही व्यवसायावर विपरित परिणाम करत आहे.
 
जमिनीच्या वापरातील बदलामुळे दुग्धव्यवसायासाठी तुलनेने कमी जागा उपलब्ध होत आहे. रोगांचा प्रादुर्भाव तसेच आरोग्य समस्यांचा प्रश्न असून, प्राणी कल्याण मानकांबद्दल वाढलेली जागरूकता शेती पद्धतींमध्ये बदल करणारी ठरली आहे. त्याचवेळी, तंत्रज्ञानात झालेला बदल गायींची संख्या कमी करणारा ठरला आहे. आधुनिक शेती पद्धती तसेच तंत्रज्ञान दूध उत्पादन वाढवणारे ठरले असले, तरी व्यवसायासाठी ते हानिकारक ठरत आहे. दूध काढणे, आहार देणे आणि देखरेख करणे यामधील आधुनिकता प्रत्येक गायीसाठी लागणारे मनुष्यबळ कमी करणारे ठरले आहे. काही दूध उत्पादक शेतकरी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी गायींचे मोठे कळप राखण्याऐवजी चीज, दही, पनीर अशा विशिष्ट उत्पादनांवर भर देत आहेत. त्याचाही परिणाम होताना दिसून येतो.

प्रजनन आणि अनुवांशिकतेतील प्रगती शेतकर्‍यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायींचे उत्पादन करण्यास अनुमती देते. परिणामी, इच्छित उत्पादन मिळविण्यासाठी कमी गायींची आवश्यकता भासते. अनुवांशिक वैशिष्ट्यांवर आधारित निवड ही गायींची संख्या कमी करते. म्हणूनच, युरोपीय महासंघात गायींची संख्या कमी होण्यास आर्थिक, पर्यावरणीय, तांत्रिक बाबी कारणीभूत ठरत आहेत. २०२३च्या सुरुवातीपासून, युरोपीय महासंघामधील शेतकर्‍यांना दुधाच्या सातत्याने घसरत्या किमती आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाचा सामना करावा लागला. समस्यांचा कायम राहिलेला हा कल त्यांचा नफा कमी करणारा ठरला असल्यामुळे, उत्पादनात घट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी देशांतर्गत दुधाचा वापरही कमी झाला आहे. उत्पादनात घट झाली असल्यामुळे, उपलब्ध दुधाचा वापर कोणत्या उत्पादनांसाठी करायचा, हे तेथील दुग्ध उद्योगाला काळजीपूर्वक ठरवावे लागणार आहे.
 
पनीर तसेच चीज यांना असलेली वाढती मागणी, त्यांचे उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध दुधाचा वापर करण्यास युरोपीय महासंघाला भाग पाडणारी ठरली आहे. देशांतर्गत मजबूत वापर तसेच वाढती निर्यात, यामुळे या दोन उत्पादनाला मागणी कायम आहे. हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्राचा होत असलेला विकास मागणी वाढवणारा ठरला आहे. २०२३ मध्ये चीजच्या निर्यातीत ३.६ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली असून, २०२४ मध्ये त्यात २.१ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. युरोपीय महासंघातील चीजच्या गुणवत्तेमुळे जगभरात त्याला वाढती मागणी आहे. म्हणूनच, उपलब्ध दुधाचा उपयोग दुग्ध पावडरपेक्षा चीज उत्पादनासाठी केला जात आहे. २०२४ मध्ये दुधाचे उत्पादन १४८.९ दशलक्ष मेट्रिक टन इतके होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते १४९.३ मेट्रिक टन इतके होते. दूध उत्पादन कमी झाल्यामुळे, कोणत्या पदार्थांचे उत्पादन घ्यायचे हे उद्योगाला प्राधान्याने ठरवावे लागत आहे. चीज उत्पादन १०.६२ मेट्रिक टन इतके होईल. तथापि, २०२३ च्या तुलनेत हे प्रमाणही कमी आहे, तसेच निर्यातीत घट होणार आहे.
 
युरोपीय महासंघातील घरगुती दुधाचा वापर तुलनेने स्थिर राहणार असून, उत्पादनात झालेली घट ठरावीक दुग्धजन्य उत्पादनांच्या उत्पादनात घट करेल. तेथील डेअरी उद्योग हा प्रमुख निर्यातदार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातून सातत्याने असलेली वाढती मागणी देशांतर्गत कमतरता भरून काढण्यास मदत करणारी आहे. म्हणूनच, आज तरी जागतिक बाजारपेठेवर युरोपीय महासंघातील कमतरतेचा फारसा परिणाम होणार नाही, असे म्हणता येते. तेथील डेअरी उद्योग आज आव्हानांचा सामना करत असला, तरी तेथील दुग्ध व्यवसाय हा मजबूत असाच आहे. तंत्रज्ञान तसेच कार्यक्षमता यांच्यात वाढ करत तो दीर्घकालीन स्थिरतेसाठी प्रयत्न करेल. पण, यादरम्यान भारतासाठीही आंतरराष्ट्रीय दुग्धव्यवसाय क्षेत्रात संधीची दारे उघडू शकतात. त्याचा भारतीय डेअरी उद्योजक आणि केंद्र सरकार कसा लाभ घेते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
 
संजीव ओक