कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन!

29 Jun 2024 18:27:53
kamgar kalyan mandal anniversary


मुंबई : 
      महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल.

तसेच सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. कामगार क्षेत्रात कार्यरत विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहतील. मंडळाशी संबंधित सर्व मान्यवर व हितचिंतकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. महाराष्ट्र कागार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत दि.१ जुलै १९५३ रोजी महाराष्ट्र कागार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.


मंडळाचे राज्यात २०८ कामगार कल्याण केंद्र असून या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने कामगार पाल्यांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना, परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती योजना, पाठ्यपुस्तक खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना, एम.एस.सी.आय.टी. अर्थसहाय्य योजना, गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य योजना, शिलाई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य आदी आर्थिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे.

तसेच मंडळाच्या वतीने शिवण प्रशिक्षण वर्ग, शिशुमंदिर, पाळणाघर, अभ्यासिका, बॅटमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, जलतरण तलाव आदी उपक्रम राबविण्यात येतात. याशिवाय कामगार कबड्डी स्पर्धा, कामगार कुस्ती स्पर्धा, भजन स्पर्धा, समरगीत स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार अशा राज्यस्तरीय योजना मंडळ राबवित आहे.


Powered By Sangraha 9.0