लडाखमध्ये जवानांवर काळाचा घाला, नदी ओलांडतांना रणगाड्याचा अपघात!

29 Jun 2024 17:33:36
indian army accident ladakh



नवी दिल्ली :        पूर्व लडाखमधील श्योक नदीत रात्री अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदी ओलांडतांना झालेल्या रणगाड्याच्या अपघातामध्ये भारतीय लष्कराच्या पाच जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. पूर्व लडाखमध्ये 28 जूनच्या रात्री लष्करी प्रशिक्षण सुरू असताना पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे सासेर ब्रांग्साजवळ श्योक नदीत लष्कराचा रणगाडा आदळला.

दरम्यान, बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, तथापि, उच्च प्रवाह आणि पाण्याच्या पातळीमुळे, बचाव मोहीम यशस्वी झाली नाही आणि रणगाड्यातील क्रूला आपला जीव गमवावा लागला. पूर्व लडाखमध्ये कार्यरत असताना पाच शूर जवान हुतात्मा झाल्याबद्दल भारतीय लष्कराला खेद आहे. पुढील बचाव कार्य सुरू आहे, असे संरक्षण पीआरओ, लेह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.




आपल्या अधिकृत निवेदनात भारतीय लष्कराने म्हटले आहे की, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराच्या लडाखमधील प्रशिक्षण क्रियाकलापादरम्यान प्राण गमावलेल्या पाच शूर सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतीय सेना यात शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभी आहे, असेही लष्करप्रमुखांनी म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या पाच जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. लडाखमध्ये एका रणगाड्यातून नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात आपल्या पाच शूर भारतीय लष्करी जवानांना प्राण गमवावे लागल्याने खूप दुःख झाले. आमच्या शूर सैनिकांनी देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे.





Powered By Sangraha 9.0