मुंबई उपनगर सर्वाधिक साक्षर जिल्हा!

27 Jun 2024 20:25:37
mumbai suburban literacy


मुंबई :       अमलीपदार्थ आणि ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या पुण्यातील साक्षरतेचे प्रमाण घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण हे अकोला, अमरावती, वर्ध्यापेक्षाही कमी; तर मुंबई उपनगर जिल्हा राज्यात सर्वाधिक साक्षर असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. सगळ्यात कमी साक्षरतेचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.

गुरुवार, दि. २७ जून रोजी २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पटलावर ठेवण्यात आला. त्यातून ही माहिती समोर आली. १९९१ च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर (७ वर्ष व अधिक वयोगट) ६४.९ टक्के होता. त्यात वाढ होऊन २०११ च्या जनगणनेनुसार तो ८२.३ टक्के झाला. सर्वाधिक साक्षरता दर मुंबई उपनगर जिल्ह्यात ८९.९ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी ६४.४ टक्के इतका आहे.

शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याचा साक्षरता दर ८६.२ टक्के, म्हणजेच मुंबई शहर (८९.२), उपनगर (८९.९), नागपूर (८८.४), वर्धा (८७), अमरावती (८७.४) आणि अकोला (८८.१) यांच्यापेक्षाही कमी आहे. २०२१ मध्ये जनगणना झाली नसल्याने सद्यस्थितीत हा दर काय आहे, याची माहिती या पाहणी अहवालात देण्यात आली नाही.

 
महाराष्ट्र आघाडीवर

देशपातळीवरील आकडेवारी पाहिली तर मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राचे साक्षरतेचे प्रमाण ८२.३४ टक्के असून उत्तर प्रदेश (६७.६८), बिहार (६१.८०), तामिळनाडू (८०.०९), गुजरात (७८.०३), राजस्थान (६६.११), कर्नाटक (७५.३६) यापेक्षा सरस आहे. तर साक्षरता प्रमाण महाराष्ट्रापेक्षा अधिक असलेल्या छोट्या राज्यांत दिल्ली (८६.२१), गोवा (८८.७०), हिमाचल प्रदेश (८२.८०), केरळ (९४), मिझोरम (९१.३३) आणि त्रिपुरा (८७.२२) यांचा समावेश आहे.



Powered By Sangraha 9.0