ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाण्यातील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई सुरु झाली आहे. गुरुवारी पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता ठाण्यातील अनेक बार व पबवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अवैध कामांविरोधात बुलडोझर घेऊन मैदानात उतरल्याचे दिसुन येत आहे.
पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते.
हे वाचलंत का? - उबाठाने 'अभ्यंकर हे भयंकर' आणि 'परब हे अरब' असल्यासारखा पैशांचा धुमाकूळ मांडला!
त्यानंतर आता ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत. त्याचबरोबर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले. त्यानुसार, एलबीएस रोड, मॉडेला नाका, उथळसर, चितळसर - मानपाडा, घोडबंदर रोडवरील बार व पबवर गुरुवारी कारवायांचा धडाका सुरू झाला आहे. याबरोबरच अनधिकृत हॉटेल, टपऱ्या, पान टपऱ्यावर देखील कारवाई सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.