अयोध्येत उभारणार संग्रहालय; देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या वास्तू इतिहासाची माहिती उलगडणार!

26 Jun 2024 16:44:20
ayodhya temple museum buildings


नवी दिल्ली :        रामजन्मभूमी अयोध्येत मंदिरांचे संग्रहालय बांधण्यात येणार असून टाटा सन्स उद्योग समूहाने याच्या बांधकामाची जबाबदारी घेतली आहे. मंदिर संग्रहालयाकरिता टाटा उद्योगसमूहाकडून ७५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश सरकारने या बांधकामास मंजूरी दिली आहे. विशेष म्हणजे संग्रहालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव टाटा समूहाकडून गेल्या वर्षी मांडण्यात आला होता.



दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. योगी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यांसदर्भात निर्णय घेण्यात आला असून टाटा समूहाच्या सहकार्याने अयोध्येत जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यासाठी भूखंड वापरासाठी परवाना देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी संग्रहालयाच्या निर्मितीबाबत माहिती दिली आहे. टाटा समूहाला मंदिर संग्रहालयासाठी फक्त एक रुपये टोकन रकमेवर ९० वर्षांकरिता भूखंड भाडेतत्त्वावर दिले जाईल. हे संग्रहालय अत्याधुनिक असेल आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बांधले जाईल. भारतातील प्रसिद्ध मंदिरांच्या वास्तू आणि इतिहासाची माहिती संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रस्तावित संग्रहालयात लाईट अँड साउंड शोचीही व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री जयवीर सिंग यांनी दिली आहे.



Powered By Sangraha 9.0