ओवेसींनी शपथेनंतर दिल्या जय पॅलेस्टाईनच्या घोषणा; राष्ट्रपतींकडे तक्रार!

    26-Jun-2024
Total Views |
asduddin owaisi president


नवी दिल्ली :      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष आणि हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या 'जय पॅलेस्टाईन' घोषणेबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे. लोकसभेत ओवेसी यांनी मंगळवारी शपथ घेताना शपथेपूर्वी बिस्मिल्लाह अशी सुरुवात करून उर्दूमध्ये शपथ घेतली, मात्र शपथेनंतर त्यांनी 'जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन'च्या घोषणा दिल्या.




ओवेसी यांच्या घोषणाबाजीनंतर अनेक खासदारांनी गदारोळ केला. त्यानंतर पीठासीन राधामोहन सिंह यांनी ओवेसी यांची ती घोषणा कामकाजातून काढण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, ओवेसी यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी त्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, संविधानाच्या कलम १०२ आणि १०३ संदर्भात असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.