मुंबई पदवीधर मतदारसंघातील २५ वर्षांची मक्तेदारी यंदा संपणार!

26 Jun 2024 13:02:03
 
Darekar
 
मुंबई : यंदा मुंबई पदवीधर मतदारसंघातील २५ वर्षांची मक्तेदारी संपेल, असा विश्वास भाजप नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, दहिसर येथील पूर्ण प्रज्ञा स्कुल मतदान केंद्रावर जाऊन प्रविण दरेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "मुंबईतील पदवीधरांचा भाजपा, महायुतीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे एक संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वरळी बीडीडी सारख्या सर्वसामान्य वसाहतीत वाढलेला तरुण कार्यकर्ता किरण शेलार हा मुंबईतील पदवीधरांचे प्रतिनिधित्व करू पाहतोय. गेली २५ वर्ष ज्यांना या मतदार संघात आपली मक्तेदारी वाटत होती ती यंदा संपणार आहे आणि भाजपा, महायुतीचा झेंडा या मतदारसंघावर फडकणार आहे. तसेच किरण शेलार प्रचंड मताधिक्क्याने मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडून येतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? - शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत नुकसान भरपाई मिळणार!
 
शिक्षक मतदारसंघातील चारही उमेदवार पाहिले तर शिक्षकांमधला शिक्षक आणि शिक्षकांसाठी काम करणारा शिवनाथ दराडे हा चांगला कार्यकर्ता आणि शिक्षक निवडणूक लढवतोय. तेसुद्धा निवडून येतील, असे दरेकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "शिक्षक, बेरोजगार पदवीधरांचे अनेक प्रश्न असून ते आम्ही मांडू. सरकार आमचे आहे. सरकारच्या माध्यमातून पदवीधरांचे सर्व प्रश्न मार्गी लावू. सगळ्या प्रश्नांची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मतदार आम्हाला पाठबळ देतील," असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
 
अमोल मिटकरींचे बोलणे बोलाची कढी, बोलाचा भात
 
यावेळी प्रविण दरेकरांनी अमोल मिटकरींवरही टीका केली. ते म्हणाले की, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. अमोल मिटकरी यांना अधिकार दिलाय का हे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर करावे जेणेकरून त्यांनी घेतलेली भुमिका अधिकृत आहे असे आम्ही समजू. अमोल मिटकरी यांच्या बोलण्याला महत्व द्यावे असे मला अजिबात वाटत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे जेव्हा भुमिका मांडतील त्यावेळी त्या भूमिकेला महत्व येईल. अन्यथा अमोल मिटकरी यांचे बोलणे बोलाची कढी आणि बोलाचा भात असून तिन्ही पक्षांचे आमचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे याबाबत निर्णय घेतील," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0