बाणगंगा तलावातील पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम ७२ तासात पूर्ण केले जाईल : मंत्री मंगल प्रभात लोढा

26 Jun 2024 19:32:24
Mangal Prabhat Lodha on Banganga Lake

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात गेल्या सहा-सात महिन्यापासून महापालिका आणि एएसआयकडून पुनरुज्जीवनाचे काम सुरु आहे. १५ दिवसापुर्वी बाणगंगा तलाव परिसराची पाहणी केली असता काम व्यवस्थित होत नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांना कळवले होते. पण काल बाणगंगा तलावातील गाळ काढण्याचे काम देण्यात आलेल्या कॅन्ट्रक्टरने पैसे वाचवण्यासाठी एक्सकेंव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केली. यामुळे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या या स्थळाचे नुकसान झाले, असे विधान कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी दि. २६ जूनला ताडदेव येथील पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना केले.

तसेच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून, या कामासाठी नियुक्त झालेल्या कॉन्ट्रॅक्टरवर एफआयआर करण्यास आणि त्याला ब्लॅक लिस्ट करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. त्याचबरोबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआई) अधिकाऱ्यांना व मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे सांगण्यात आले असून, पुढील ७२ तासात हे काम पूर्ण केले जाईल. या पुढे अशी कोणतीही घटना होऊ नये, यासाठी स्थानिकांची एक कमिटी देखील स्थापन करण्यात येणार आहे. सदर कमिटी पुढे होणाऱ्या कामकाजावर देखरेख करेल. संपूर्ण घटनेची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कमिटी स्थापित होणार असून, ही कमिटी पुढील १५ दिवसात अहवाल सादर करेल, असे आश्वासन ही मंत्री लोढा यांनी दिले.

 
Powered By Sangraha 9.0