नवी दिल्ली : नुकतीच भारत आणि बांग्लादेश यांच्यात दहा महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. या करारांपैकीच एक असलेला तिस्ता करारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, तिस्ता नदी करारावरील चर्चा राज्याला अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी करारावरील केलेले दावे केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. तिस्ता नदीवरील कराराच्या चर्चेत पश्चिम बंगालला सहभागी करून घेण्यात आले होते. त्याचबरोबर, यासंदर्भातील आवश्यक डेटाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी बांग्लादेशसोबतच्या तीस्ता करारावर आक्षेप घेतला आहे.
काय आहे तीस्ता पाणी करार?
तीस्ता नदी ही भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या ५० हून अधिक लहान-मोठ्या नद्यांपैकी एक आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन प्रमुख नद्या भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहतात. ४०० किलोमीटर लांबीची तीस्ता नदी हिमालयातील तीस्ता खांगत्से हिमनदीतून उगम पावते आणि सिक्कीम मार्गे पश्चिम बंगालमध्ये वाहते. पश्चिम बंगालमधून पुढे बांगलादेशात जाते आणि तेथेच ब्रह्मपुत्रेला मिळते. तीस्ता नदी ही उत्तर बंगालमधील प्रमुख नद्यांपैकी एक असून लाखो लोकांची उपजीविका अवलंबून आहे.
तिस्ता पाणी कराराची चर्चा नवी नसून यासंदर्भात दोन देशांदरम्यान अनेक दशकांपासून चर्चा सुरू आहे, परंतु कोणताही ठोस करार झालेला नसून यासंदर्भात तात्पुरता करार दोन्ही देशांमध्ये १९८३ मध्ये झाला होता. या अंतर्गत बांगलादेश या नदीतून ३६ टक्के पाणी घेऊ शकतो तर भारत ३९ टक्के पाणी वाटा घेऊ शकतो. उर्वरित२५ टक्के पाणी वाटप न करता सोडण्यात आले. हा करार १९८५ पर्यंतच वैध होता.