जीएसटीमुळे १४० कोटी भारतीयांच्या जीवनात परिवर्तन – पंतप्रधान नरेंद्र मोदी
25 Jun 2024 17:55:43
नवी दिल्ली : वस्तू व सेवा करामुळे १४० कोटी भारतीयांच्या जीवनात परिवपर्तन आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशभरात जीएसटी लागू होऊन लवकरच ७ वर्षे पूर्म होत आहेत. मोदी सरकारने १ जुलै २०१७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी केली होती.
त्याविषयी पंतप्रधान मोदी ‘एक्स’वर म्हणाले की, १४० कोटी भारतीयांचे जीवन सुधारण्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून केलेल्या सुधारणा आमच्यासाठी एक माध्यम आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर घरगुती वस्तू खूपच स्वस्त झाल्या आहेत. यामुळे गरीब आणि सामान्य माणसाची मोठी बचत झाली आहे. लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी या सुधारणा पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) आकडेवारीनुसार, जीएसटी लागू झाल्यानंतर पीठ, सौंदर्यप्रसाधने, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर इत्यादींसह घरातील बहुतांश वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर स्वस्त घरगुती वस्तूंमुळे लोकांवरील आर्थिक भार कमी झाला असून लोकांची बचत करण्याची क्षमताही सुधारली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.