नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आणीबाणीला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकशाहीच्या या काळ्या दिवसाचे स्मरण केले. ते म्हणाले की, "आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आजचा दिवस आहे." काँग्रेसवर निशाना साधताना ते म्हणाले की, "आणीबाणीचा काळा दिवस आपल्याला आठवण करून देतो की काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य कसे नष्ट केले आणि भारतीय संविधान पायदळी तुडवले, ज्याचा प्रत्येक भारतीय मनापासून आदर करतो."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सत्तेत राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान केला आणि देशाला तुरुंगात बदलले. काँग्रेसशी असहमत असलेल्या प्रत्येकाचा छळ करण्यात आला. सर्वात असुरक्षित वर्गांना लक्ष्य करण्यात आले आणि सामाजिक प्रतिगामी धोरणे लागू करण्यात आली."
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला संविधानावर प्रेम दाखवण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य केले. ते म्हणाले की, "ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानावर प्रेम दाखवण्याचा अधिकार नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी अगणित प्रसंगी कलम ३५६ लादले, प्रेस स्वातंत्र्य कमी करणारी विधेयके मंजूर केली, संघराज्य नष्ट केले आणि संविधानाने घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचे उल्लंघन केले."
काँग्रेसची आजची मानसिकता ही आणीबाणी लादण्याची आहे, अशीही टीका मोदींनी केली. ते म्हणाले की, "ज्या मानसिकतेमुळे आणीबाणी लादण्यात आली तीच मानसिकता काँग्रेसमध्ये आहे. राज्यघटनेबद्दलचा तिरस्कार ते लपवतात पण भारतातील जनतेला त्यांची कृती कळली आहे. यामुळेच जनतेने त्यांना वारंवार नाकारले आहे."