पंतप्रधान मोदींनी घेतली सलग तिसऱ्यांदा खासदारकीची शपथ; म्हणाले, "हा दिवस..."

24 Jun 2024 11:42:31
 pm modi
 
नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राची पहिली बैठक सुरू झाली आहे. बैठकीच्या पहिल्या सत्रात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ सलग तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे.
 
पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. कामकाज सुरू होताच, सभागृहाचे नेते म्हणून मोदींनी सर्वप्रथम शपथ घेतली. शपथविधीच्या आधी पंतप्रधान मोदींचे भाषण झाले. संसदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, हा गौरवाचा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनीही नव्या खासदारांचे स्वागत केले आणि देश चालवण्यासाठी सहमती आवश्यक असल्याचे सांगितले. आजपासून सुरू झालेले संसदेचे अधिवेशन ३ जुलैपर्यंत चालणार आहे.
 
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील जनतेची अपेक्षा आहे की विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाला चांगल्या आणि जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. १८व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना या अधिवेशनाचा उपयोग जनहितासाठी करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, “देशाला सर्व खासदारांकडून खूप अपेक्षा आहेत. मी सर्व खासदारांना विनंती करेन की त्यांनी या संधीचा उपयोग जनहितासाठी करावा आणि सार्वजनिक हितासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलावे.
 
Powered By Sangraha 9.0