आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर मित्रपक्षावर फुटले; पुन्हा एकदा वादाची शक्यता

23 Jun 2024 17:35:41
mva alliance candidate lose seat
 

महाराष्ट्र :       उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी(शरद पवार गट), काँग्रेस या पक्षांना डिवचण्याची संधी सोडलेली नाही. लोकसभा निवडणुकीत मविआने राज्यात ३० जागांवर विजय मिळविला होता. या घवघवीत यशानंतरदेखील सांगलीतील जागेची चर्चा राज्यात पाहायला मिळाली होती.

दरम्यान, उबाठा गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देण्यात आला होता. निवडणुकीपुर्वी १-२ महिने आधीच चंद्रहार पाटील यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला. या जागेकरिता मविआत चढाओढ पाहायला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आता खा. संजय राऊत यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले, या जागेवर राष्ट्रवादी(शरद पवार गट)ने काम केले नाही. त्याचबरोबर, काँग्रेस पक्षानेदेखील आमच्यासाठी स्थानिक पातळीवर काम केले नसल्याचेही राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे लोकसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मविआचे प्रमुख नेते शरद पवार यांनी विधानसभेकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेटदेखील जास्त असल्याने अधिक जागा लढवायला हव्या होत्या. मविआत वितुष्ट येऊ नये म्हणून दोन पावले मागे आलो. असे विधान खुद्द शरद पवार यांनी केले. त्यानंतर आता संजय राऊत यांनी सांगली जागेवर घटक पक्षांनी काम न केल्याने शिवसेना(उबाठा गटा)च्या उमेदवाराला फटका पडल्याचे राऊत म्हणाले.



Powered By Sangraha 9.0