नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नव्या संकुलाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानिमित्ताने भारतीय ज्ञानपरंपरेचा प्राचीन वारसा लाभलेल्या नालंदा विद्यापीठाच्या गतवैभवावर टाकलेला हा प्रकाश...
भारताचा शैक्षणिक इतिहास फार प्राचीन आहे. गुरुशिष्य परंपरा हा भारतीय शिक्षणाचा गाभा आहे. ही परंपरा काही फक्त वेदाध्ययनाचाच अविभाज्य भाग नाही. मूलगामी विचारांचे निर्माण आणि मंथन, इतरांच्या विचारांचे अवलोकन व परीक्षण, स्वतःच्या विचारांची समीक्षा करण्याची मानसिक तयारी आणि यामधून होणारे बदल आत्मसातच नव्हे, तर आपण शिकत असलेल्या शास्त्राच्या चौकटीत सामावून घेत प्राचीन किंवा आधुनिक गुरुशिष्यपरंपरा विकसित होत असते. वेदापासून मूळ धरू लागलेल्या या परंपरेने उपनिषदांमध्ये विशाल स्वरूप धारण केले. गुरुगृही जाऊन शिकायचे या गुरुकुल पद्धतीमधूनच आश्रम, मठ, पाठशाळा, विहार किंवा संघ-आराम इ. शैक्षणिक संकुले निर्माण झाली. कोणतेही विद्यापीठ निर्माण होण्याआधी वैचारिक प्रगतीवर आधारित साहित्य निर्माण व्हावे लागते. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा साहित्यिक इतिहास पाहिला, तर प्राचीन भारतात अनेक शैक्षणिक संकुले निर्माण होत होती, हे समजणे अवघड नाही.
प्राचीन भारतात तीन विश्वविख्यात विद्यापीठे होती... तक्षशीला, नालंदा आणि वलभी. यापैकी तक्षशीला विद्यापीठ सर्वात प्राचीन. त्यानंतरचे विद्यापीठ नालंदा आणि त्यानंतरचे वलभी. भारताच्या वायव्येकडे म्हणजे आजच्या पाकिस्तानात तक्षशीला विद्यापीठ होते, तर इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात मैत्रकांच्या राजाश्रयाने वृद्धिंगत होणारे वलभी विद्यापीठ गुजरातमध्ये होते. नालंदा विद्यापीठ भारताच्या पूर्वेला, बिहारमध्ये राजगृह (राजगीर) येथे होते. अशाप्रकारे तत्कालीन आर्यावर्ताच्या तीन दिशा विद्यादानासाठी सज्ज होत्या.
भारताचा प्राचीन इतिहास आख्यायिकांमध्ये गुरफटलेला किंवा शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी इ. मध्ये लपलेला आहे. या साधनांचा अन्वयार्थ योग्य पद्धतीने लावला, तर या इतिहासाच्या एखाद्या कोपर्यावर प्रकाश पडतो. नालंदा विद्यापीठही याला अपवाद नाही. भारतामध्ये उत्खननाचा श्रीगणेशा करणार्यांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करणार्या अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे नाव घेता येईल. त्यांनीच सर्वप्रथम नालंदा हे महत्त्वाचे प्राचीन ठिकाण आहे आणि त्याठिकाणी उत्खनन केल्यास भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत होईल, हे मांडले. त्यानंतर इथे उत्खनन करायला 1915 साल उजाडले. 1915 ते 1937 हे स्वातंत्र्यपूर्व काळातील उत्खनन आणि 1974 ते 1982 हे स्वातंत्र्योत्तर काळातील उत्खनन असे याचे दोन टप्पे सांगता येतील.
प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या माहितीसाठी ग्रांथिक मूलाधार मिळतो तो म्हणजे ह्यूएनत्संग यांचे प्रवासवर्णन. तो एक चिनी भिक्षू होता. चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार साधारणपणे पहिल्या शतकापासून झाला. काही भारतीय बौद्ध भिक्षू चीनमध्ये आपल्याबरोबर बौद्ध ग्रंथ घेऊन गेले होते. त्यापैकी काहींची चिनी भाषेतली भाषांतरेही हळूहळू उपलब्ध होऊ लागली होती. तथापि, बौद्ध धर्माला राजाश्रय आणि अनुयायी दोन्हींचे प्रमाण कमी होते. कालांतराने चौथ्या शतकापासून बौद्ध धर्म चीनमध्ये मूळ धरू लागला. फा हायन हा भारतात आलेला पहिला चिनी बौद्ध भिक्षू. बौद्ध ग्रंथांच्या चिनी भाषांतरात त्याला त्रुटी आढळल्या. म्हणून प्रत्यक्ष भारतात जाऊन शिकण्याची प्रबळ इच्छा त्याला झाली. तो भारतात इसवी सन 399-412 या कालावधीमध्ये होता. त्या काळात नालंदा विद्यापीठ अस्तित्वात नव्हते.
नालंदा प्राचीन काळापासून एक पवित्र ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. राजगृहाजवळच्या काही श्रेष्ठींनी एकत्र येऊन एक मोठी आमराई विहारासाठी दान केली होती. हाच विहार ‘नालंदा विहार’ म्हणून प्रसिद्ध होता. शिवाय, या राजगृहाजवळ असलेला नालंदा विहारात प्रत्यक्ष भगवान बुद्धाचे पाय लागले होते. ते स्थान बौद्ध भिक्षूचे तीर्थस्थान होते. भारतात ज्यांच्या राजवटीमध्ये सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात, त्या गुप्त राजघराण्याने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या पाचव्या शतकात केली. सम्राट समुद्रगुप्ताचा पुत्र द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा मुलगा कुमारगुप्त. याच कुमारगुप्ताने नालंदा विहाराचे विद्यापीठ, नालंदा महाविहार केले. तिथे देशोदेशीचे विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ लागले.
कुमारगुप्तानंतर सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला 100 खेडी दान दिली होती. या खेड्यांमध्ये होणार्या शेती इत्यादीचे उत्पन्न या विद्यापीठाला मिळत असे. त्यातून विद्यार्थ्यांचा राहण्या-जेवणाचा खर्च केला जाई. त्यानंतर बंगालच्या पाल राजांनी हे विद्यापीठ भरभराटीस आणले. फा हायननंतर आलेला ह्यूएनत्संग मात्र नालंदा या विद्यापीठाची कीर्ती ऐकूनच भारतात आला होता. इसवी सन 629-645 या कालावधीत तो भारतात फिरला. मूळ ग्रंथ ज्ञानी गुरूकडून शिकणे ही त्याची मनीषा होती. त्यासाठी त्याने नालंदा विद्यापीठाची निवड केली होती. नालंदा विद्यापीठात कार्यरत असलेल्या शांतरक्षित नावाच्या गुरूकडे तो चार वर्षे शिकला आणि त्यानंतर त्याने याच विद्यापीठात अध्यापनही केले. त्याने लिहून ठेवलेल्या वर्णनावरून या विद्यापीठाचे स्वरूप काहीसे लक्षात येते.
या विद्यापीठाला आठ विभाग होते (compounds). ‘नालंदा महाविहार’ असे त्याचे नाव होते. या महाविद्यालयांमध्ये दहा मंदिरे, ध्यान मंदिरे, वर्ग, तळी आणि बागा होत्या. कोरिया, जपान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया आणि तुर्कस्तान इथून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी ही मौखिक परीक्षा होई. जो विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होईल, त्यालाच या विद्यापीठामध्ये शिक्षण घेता येत असे. सुमारे दहा हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिकत होते. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे होती. विद्यार्थ्यांची राहायची सोय असलेले हे जगातले पहिले विद्यापीठ मानले जाते. इथल्या एका इमारतीत सुमारे 35 विद्यार्थी राहत असत. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोली असे. मोठ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र लहानसे ध्यानमंदिरही असे. सुमारे दोन हजार शिक्षकांचीही याच विद्यापीठात राहण्याची व्यवस्था होती.
एका मोठ्या चबुतर्यावर बसून शिक्षक शिकवत असत. त्यांच्या भोवती बसून विद्यार्थी शिकत असत. नालंदामध्ये शिक्षण घेण्यासाठी फक्त भिक्षूच येत होते असं नाही. शुभ्र वस्त्रं धारण केलेली सामान्य मुलेही येत असत. त्यांना ‘माणव’ (माणवक, लहान माणूस, मुलगा) म्हणत असत. ज्यांना फक्त लौकिक साहित्य वाचायचं आहे, असेही विद्यार्थी तिथे येत असत. त्यांना ‘ब्रह्मचारिन्’ म्हणत असत. माणव आणि ब्रह्मचारी यांना फी भरून शिक्षण घ्यावे लागे. या विद्यापीठात घटिका यंत्राच्या साहाय्याने रोजचा दिनक्रम पार पाडला जाई. विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही आठ तास काम करीत. गणित आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये या विद्यापीठाने खूप प्रगती केली होती. आर्यभट याला भारतीय गणितशास्त्राचा जनक मानले जाते. शून्याचा शोध लावणारा गणितज्ञ अशी त्यांची ओळख आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात तो नालंदा विद्यापीठाचा प्रमुख होता, असे मानले जाते.
नालंदा विद्यापीठ त्यांच्या ग्रंथालयासाठी जगभरात प्रसिद्ध होते. या ग्रंथालयाच्या तीन इमारती होत्या. ‘रत्नोदधी’, ‘रत्नसागर’ आणि ‘रत्नरंजक.’ त्यापैकी एक नऊ मजली होती. त्याकाळी छापण्याची कला जगाला माहीत नसल्यामुळे महत्त्वाच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तयार करून ठेवणे आणि त्यांचे हवे तेव्हा वाचन करणे, हे काम ग्रंथालयात चालत असे. या ग्रंथालयांमध्ये एकूण नव्वद लाख हस्तलिखिते होती, असे म्हणतात.
ह्यूएनत्संगने भारतीय विद्यालयांमधल्या शिक्षण पद्धतीवरही प्रकाश टाकला आहे. अनेक ग्रंथ संस्कृत भाषेत असल्यामुळे संस्कृत व्याकरणाचे, पाणिनीय व्याकरणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात. चिनी भाषेत झालेल्या अनुवादामध्ये संस्कृत व्याकरणाचे नियम कसे असतील? म्हणून अनुवाद नेमका झाला आहे की नाही, अशी शंका चाणाक्ष विद्यार्थ्यांना येत असे. भारतीय विद्यापीठांमध्ये मात्र अष्टाध्यायी, धातुपाठ (संस्कृत क्रियापदे आणि त्यांचे अर्थ), उणादिसूत्रे (ज्यांची संस्कृत भाषेप्रमाणे व्युत्पत्ती लावता येत नाही अशी संस्कृतेतर शब्दांची यादी), काशिकावृत्ती (वामन आणि जयादित्य यांनी अष्टाध्यायीवर रचलेली टीका), पतंजलीचे महाभाष्य इ. ग्रंथ शिकवले जात असत.
व्याकरणाप्रमाणेच महत्त्वाचा विषय म्हणजे हेतुविद्या. हेतू म्हणजे कारण आणि योग्य कारण ज्यामुळे समजते ते शास्त्र म्हणजे हेतुविद्या किंवा तर्कशास्त्र. तेही इथल्या अभ्यासक्रमाचा भाग होता. ह्यूएनत्संग लिहितो, ’भारतामध्ये विद्या मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पाठ करून लक्षात ठेवणे आणि दुसरी म्हणजे प्रत्येक कल्पनेला एक मुळाक्षर देणे. अशा रीतीने जर तयारी केली, तर दहा दिवसांत एखाद्या झर्याप्रमाणे विचार धावू लागतात.” याखेरीज शिकणे आणि त्यावर चर्चा करणे यासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध होते.
ह्यूएनत्संगने आपल्याबरोबर सुमारे 657 संस्कृत ग्रंथांची हस्तलिखिते नेली. त्यातल्या ‘योगाचारभूमिशास्त्र’, ‘अभिधर्मकोशशास्त्र’, ‘महाप्रज्ञापारमितासूत्र’ या तीन महत्त्वाच्या ग्रंथांचे त्याने चिनी भाषेत अनुवाद केले. नंतर 12व्या शतकात हे विद्यापीठ बख्तियार खिलजी याने जाळले. आज या विद्यापीठातली ग्रंथसंपदा तिबेटी आणि चिनी अनुवादांमध्येच जपलेली आहे. भारतातले आणि परदेशातले अनेक अभ्यासक या अनुवादांवरून मूळ संस्कृत ग्रंथ निर्माण करण्याचे काम करत आहेत.
निर्मला कुलकर्णी
(लेखिका संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिक आहेत.)