लोकसभा निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती टाळणार

22 Jun 2024 19:37:16
loksabha election bjp


मुंबई :     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी शुक्रवार, दि. २१ जून रोजी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निकालाचे विश्लेषण करण्यात आले. तसेच या निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जो निकाल समोर आला, त्या निकालाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात आले. महाविकास आघाडी, खासकरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अपप्रचार करून मते मिळविली. भाजप संविधान बदलणार, असा खोटा प्रचार केला. आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क हिसकावले जाणार. महिलांना सांगितले की, महिन्याला खटाखट साडेआठ हजार रुपये देणार. असा खोटा प्रचार केल्यामुळे भाजपला फटका बसला.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी कोण उमेदवार असतील, यावरही चर्चा झाली, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.


जनतेला आता सत्य कळले

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला. पण आता लोकांना सत्य कळले आहे. केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असेल, तर जनतेचा फायदा होतो. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या योजना थांबविल्या जातील. केंद्र सरकार राज्याला मदत करू इच्छिते, पण राज्य सरकारने योग्य सहकार्य न केल्यास राज्याच्या जनतेचे नुकसान होऊ शकते, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


Powered By Sangraha 9.0