पारदर्शक व निष्पक्ष परीक्षांसाठी उच्चस्तरीय समिती!

22 Jun 2024 18:45:58
commitee central education


नवी दिल्ली :     राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण विभागाने तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. उच्चस्तरीय समिती परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेतील आवश्यक सुधारणा, माहितीसाठ्याच्या सुरक्षा विषयक नियम सुधारणा, राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना आणि कामकाज याविषयी शिफारशी सादर करणार आहे.

हा आदेश जारी झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत समिती आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे. त्याचप्रमाणे समितीस आपल्या मदतीसाठी इतर कोणत्याही विषयतज्ज्ञाची निवड करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के. राधाकृष्णन या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांचा समावेश सदस्य म्हणून करण्यात आला आहे.

समितीमध्ये हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बी.जे.राव; प्रोफेसर एमेरिटस, आयआयटी मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक राममूर्ती के; पीपल स्ट्राँगचे सह-संस्थापक आणि कर्मयोगी भारतचे संचालक मंडळाचे सदस्य पंकज बन्सल; आयआयटी दिल्लीतील विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता प्रा. आदित्य मित्तल; शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल यांचाही समावेश आहे.


समिती सुचविणार या शिफारशी


(१) परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेत सुधारणा

(अ) संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे विश्लेषण करणे आणि यंत्रणेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच संभाव्य उल्लंघन टाळण्यासाठी उपाय सुचवणे.

(ब) राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या मानक कार्यपद्धतीचा (एसओपी) / नियमाधारीत व्यवस्थेचा सखोल आढावा घेणे आणि प्रत्येक टप्प्यावर त्याचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी देखरेख यंत्रणेसह या प्रक्रिया / नियमाधारीत व्यवस्था बळकट करण्यासाठी उपाय सुचविणे.

(२) माहितीसाठ्याच्या सुरक्षाविषयक नियमाधारीत व्यवस्थेत सुधारणा

(अ) राष्ट्रीय चाचणी संस्थेची विद्यमान माहितीसाठी सुरक्षा प्रक्रिया आणि नियमाधारीत व्यवस्थेचे मूल्यमापन करणे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाय सुचवणे.

(ब) विविध परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासंबंधीच्या तसेच इतर प्रक्रियांशी संबंधित विद्यमान सुरक्षा विषयक नियमाधारीत व्यवस्थेची तपासणी करणे तसेच या संपूर्ण व्यवस्थेच्या ठोस बळकटीकरणासाठी उपाय सुचवणे.

(३) राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना आणि कार्यपद्धती

(अ) मुद्दा (१) आणि (२) अंतर्गत दिलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची संस्थात्मक रचना आणि कार्यपद्धती कशी असावी याबाबत शिफारशी करणे आणि प्रत्येक स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका तसेच जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे निश्चित करणे.

(ब) राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या सध्याच्या तक्रार निवारण यंत्रणेचे मूल्यमापन करणे, यात सुधारणांना वाव असलेली क्षेत्रे निश्चित करणे तसेच या व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शिफारशी करणे.



Powered By Sangraha 9.0