भारत आणि बांगलादेशदरम्यान १० महत्त्वाचे करार!

22 Jun 2024 19:04:43
bharat bangladesh bilateral talk


नवी दिल्ली :
      भारत आणि बांगलादेश यांनी शनिवारी सागरी क्षेत्रातील संबंधांना प्रोत्साहन देणे आणि ब्लू इकॉनॉमी यासह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात व्यापक चर्चेनंतर करारांना अंतिम रूप देण्यात आले. धोरणात्मक बाबी, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्यपालनावरील करारांचा समावेश आहे.

करारांनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारत आणि बांगलादेशदरम्यान आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भविष्यातील दृष्टीकोन तयार केला आहे. हरित भागीदारी, डिजिटल भागीदारी, महासागरावर आधारित अर्थव्यवस्था आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रात सहकार्यावर झालेल्या सहमतीचा फायदा दोन्ही देशांच्या तरुणांना होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.


आपल्या वक्तव्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत हा बांगलादेशचा प्रमुख शेजारी आणि विश्वासू मित्र असल्याचे वर्णन केले आहे. त्या म्हणाल्या की, भारत हा आपला मुख्य शेजारी, विश्वासू मित्र आणि प्रादेशिक भागीदार आहे. त्याचप्रमाणे १९७१ च्या मुक्तिसंग्रामापासून सुरू झालेल्या भारतासोबतच्या संबंधांना बांगलादेश खूप महत्त्व देतो, असेही त्या म्हणाल्या.

भारताने बांगलादेशातील नागरिकांना वैद्यकीय ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यासाठी भारत सरकार बांगलादेशातील रंगपूर येथे उप उच्चायुक्तालय उघडणार आहे. याशिवाय, तिस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी तांत्रिक टीम पाठवण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्यात एकूण १० करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. ज्यात डिजिटल भागीदारी, हरित भागीदारी, सागरी सहकार्य, समुद्रावर आधारित अर्थव्यवस्था, अंतराळ क्षेत्रात सहकार्य, रेल्वे कनेक्टिव्हिटी, सागरी संशोधन, सुरक्षेत परस्पर सहकार्य आणि परस्पर सहकार्य यांचा समावेश आहे.




Powered By Sangraha 9.0