महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात खितपत पडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि येथील प्रजेसाठी लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली. ‘स्व’त्वाच्या आधारे राज्य निर्माण करून सुशासनाचा आदर्श महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराजांच्या सुशासनाचे अनुकरण राजर्षी शाहू महाराजांनी केले. प्रजेवर पुत्रवत प्रेम आणि मातृहृदयाने काळजी घेण्याचा शिवछत्रपतींचा वारसा शाहू महाराजांनी समर्थपणे चालवला होता. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा जपणार्या शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान देणारा हिंदू वीराग्रणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे अवघा उत्तर भारत पाहत होता. कविराजभूषण महाराजांना ’हिंदुपदपातशाह’ म्हणतो. कोल्हापूर गादीनेदेखील हिंदुपदपातशाहीची परंपरा चालवली होती. 1894 साली राजर्षी शाहू महाराज जेव्हा राज्यावर आले तेव्हा लोकमान्य टिळकांनी ’केसरी’त लेख लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. लेखाच्या शेवटी टिळकांनी लिहिले होते, ”हिंदुत्वाचा योग्य अभिमान बाळगून त्याच्या अभ्युदयाकरिता निष्काम बुद्धीने आपला देह झिजविणे हे कोल्हापूरकर महाराजांचे कुलव्रत आहे. ते पाळण्यास श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांस ईश्वर सुबुद्धी, धैर्य आणि दीर्घायुष्य देवो व महाराजांस त्याप्रमाणे यशप्राप्ती होऊन त्यांचा सदैव उत्कर्ष होवो, अशी आजच्या मंगलप्रसंगी प्रार्थना करून हा स्वल्प अभिनंदनपर लेख येथेच संपवितो”.
अशा प्रकारे शाहू महाराज हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे राजे होते. करवीर छत्रपती आपल्या कोटावर जरीकामात विणलेले मानचिन्ह वापरत असत. त्यावर स्पष्टपणे ’हिंदुपदपातशाह’ अशी अक्षरे होती. (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, डॉ. जयसिंगराव पवार, पान क्र. 1133) हिंदुत्व या देशाची जीवनपद्धती असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेदेखील म्हटले आहे. विशिष्ट उपासनापद्धती किंवा उपास्यदेवता मान्य केल्यावरच माणसाला मुक्ती किंवा स्वर्ग मिळेल, अशी संकुचित भूमिका हिंदुत्वाची नाही किंवा हिंदुत्व अन्य उपासनापद्धतीचे अस्तित्वही नाकारत नाही. आज जगभर असहिष्णूतेमुळे हिंसाचाराचे थैमान सुरू असताना भारताचे वेगळेपण दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराजापर्यंतच्या लोकोत्तर महापुरुषांनी आचरणात आणलेली हिंदुत्व ही वैश्विक आणि व्यापक संकल्पना आहे, त्यामुळे आपल्या देशात विविध उपासनापद्धतीचे आणि नास्तिक लोकदेखील गुण्यागोविंदाने राहू शकले. राज्य कारभार करताना हीच व्यापक भूमिका छत्रपती शाहू महाराजांची होती. त्यामुळे त्यांचे ’हिंदुपदपातशाह’ हे बिरूद सार्थ ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे उपेक्षित, वंचित समाजाला हिंदवी स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतले आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. आधुनिकसंदर्भात राजर्षी शाहू महाराज यांनी त्यासाठी अधिक व्यापक प्रयत्न केला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या संस्थानातील उपेक्षित, वंचित समाजघटकांचा उद्धार केला.
राजर्षी शाहू महाराजांनी 1894 साली करवीर संस्थानचा कारभार हाती घेतला, तेव्हा राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता हे तीन कलंक मिटवल्याशिवाय आपल्या रयतेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. खर्या अर्थाने ते सामाजिक न्यायाचे उद्गाते होते. सर्व समाज हा समता आणि बंधुत्वाच्या सूत्राने बांधून ठेवण्याचा भारतीय राज्यघटनेचा जो ध्येयवाद आहे, त्याचा प्रारंभ करवीर संस्थानात पूर्वीच झाला होता. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथात म्हटल्याप्रमाणे स्वराज्य संस्थापक शिवाजी राजांमध्ये शाहू महाराजांना एक ’समाजसुधारक’ ही दिसत होता. जातीपातीची बंधने उद्ध्वस्त करण्यासाठी जेव्हा ते पुढे उत्तरायुष्यात उभे राहिले, तेव्हा त्यांनी शिवछत्रपतींच्या एका धाडसी सामाजिक कृत्याचा दाखला दिलेला दिसून येतो. आपल्या मराठा जातीच्या लोकांना पुढे होऊन जातीनिर्बंध तोडून टाकण्याचे आवाहन करताना ते म्हणतात, सुधारणेच्या सर्व चळवळीत पुढाकार घेणे हे उच्चवर्णीयांचे कर्तव्य आहे.जपान देशातील ’सामुराऔं’ जातीने, म्हणजे त्या राष्ट्रातील क्षत्रिय वर्णाने, त्यांचे जातीनिर्बंध मोडून टाकण्याबाबत पुढाकार घेतला.
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या आमच्यातील थोर व पूज्य विभूती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपणापुढे ठेविलेले ध्येय आज विसाव्या शतकात आपण आपल्या नजरेपुढे ठेविले पाहिजे. त्यांचे अनुकरण केले पाहिजे.... थोरल्या शिवाजी महाराजांनी, जे उदाहरण घालून दिले आहे, त्याकडे त्यांनी (मराठ्यांनी) दुर्लक्ष करू नये. फलटणच्या निंबाळकर घराण्यापैकी एका पुरुषाने मुसलमानी धर्माची दीक्षा घेऊन एका मुसलमान स्त्रीशी लग्न केले होते. त्या पुरुषास त्या थोर विभुतीने पुन्हा आपल्या जातीत घेतले आणि आपल्या परमपूज्य श्री जिजाबाईसाहेब यांच्या संमतीने त्यांनी निंबाळकरांच्या मुलाशी आपल्या स्वतःच्या मुलीचा विवाह करून दिला. (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ) छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुसलमान झालेल्या नेतोजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिल्याचे उदाहरण प्रसिद्धच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे समाजात युगानुकूल सुधारणा केली, त्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांनीही आपल्या राज्यात सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या राज्यात सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले तसेच सर्व जातींच्या मुलांना वेदांचे शिक्षण मिळावे आणि संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट होऊन समाज समरस व्हावा, यासाठी प्रयत्न करणार्या आर्य समाजाला शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात उदार आश्रय दिला होता. 1917 साली स्वामी परमानंदांनी कोल्हापूरजवळील केरले या गावी प्राथमिक शाळा आणि गुरुकुल स्थापन केले होते, त्या गुरुकुलांतील विद्यार्थ्यांच्या भोजनखर्चासाठी शाहू महाराजांनी पाच हजार रुपये मंजूर केल्याचे एक पत्र उपलब्ध आहे. पुढे 1918 साली कोल्हापुरात शाहू महाराजांच्या आदेशाने आर्य समाजाच्या वतीने एक शाळा व त्यासोबत एक ’गुरुकुल’ स्थापन करण्यात आले. त्यासाठी जागा व इमारती उपलब्ध करून दिल्या. येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली होती. आर्य समाजाच्या गुरुकुलात तथाकथित अस्पृश्यांसह सर्व जातीच्या मुलांना मुक्त प्रवेश होता. शाहू महाराजांनी घडवून आणलेले हे युगानुकूल परिवर्तन होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांचीही वेदांवर निष्ठा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालवला. शाहू महाराज म्हणतात, देशाला जागृत करणारी रामबाण मात्रा वैदिक धर्मच आहे. कारण, हिंदुमात्राच्या अंतःकरणात वेदाभिमान वसत आहे व आर्य समाज वेदानुकूल राहण्यातच आपला धर्म समजत आहे. आर्य समाजाचा धर्म जगावर उपकार करण्याचा आहे. सज्जनहो! वैदिक धर्माचे महत्त्व अन्य मतांपेक्षा अधिक आहे, हे समजूनच मी या धर्माचा स्वीकार केला आहे. (राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण 8 मार्च 1920 संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, पान क्र - 841, द्वितीय आवृत्ती संपादक - डॉ. जयसिंगराव पवार) शाहू महाराज म्हणाले की, मी राजाराम कॉलेज, हायस्कूल, गुरुकुल, अनाथाश्रम, सरदार बोर्डिंग या संस्था आर्य प्रतिनिधी सभेकडे सोपविल्या. आर्य समाजाचे शिक्षक आणि विचारवंत माझा उद्देश सफल करतील, म्हणून त्यांच्याकडे मी या संस्था सोपविल्याचे त्यांनी सांगितले. जमलेल्या प्रतिनिधी आणि प्रमुख सूत्रधारांनी अशाच प्रकारच्या शिक्षणसंस्था महाराष्ट्रात स्थापन कराव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर माझे त्यास सर्वतोपरी साहाय्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
वैदिक धर्माचा प्रसार करण्याचा उपदेश करून ते म्हणाले की, जर अशा प्रयत्नांनी वैदिक धर्माचा प्रसार झाला नाही तर तो दोष तुमच्यावर व आर्य प्रतिनिधी सभेवर येईल. पुढे बोलताना त्यांनी एके दिवशी वैदिक धर्म हा जगाचा धर्म बनेल, असा आशावादही व्यक्त केला होता. शिवाजी वैदिक विद्यालयाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे आज आपण कितपत उन्नतीच्या मार्गावर आहोत, हे आपणास भूतकाळाच्या सूक्ष्म सिंहावलोकनाने सहज दिसून येईल. पाश्चात्य राष्ट्रांची भरभराट जितक्या जोमाने व लवकर झाली, तितकी आमच्या हिंदुस्थानची का झाली नाही? हा प्रश्न साहजिकच उद्भवतो; याचे खरे कारण असे की, या देशातील हिंदूधर्मीय म्हणविणार्या लोकांस आपल्या वेदप्रणीत धर्माची स्मृती न राहता, त्यांच्यात रूढीधर्म प्रचलित झाला व त्या योगे त्यांची सामाजिक स्थिती ऐक्याची राहिली नाही. आपल्या राष्ट्राच्या अवनतीचे हे खरे कारण श्री शाहू छत्रपतींच्या पूर्ण लक्षात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांना लाभला होता. शिवशाहीप्रमाणे करवीर संस्थानात शाहू महाराजांनी लोककल्याणकारी कामे केली. शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले.
शेतकरी जगला पाहिजे, हे ध्येय त्यांनी उराशी बाळगत शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून दिली. त्याशिवाय शेतीला आणि जनतेला पाण्याची कमतरता राहू नये म्हणून त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली. शाहू महाराजांनी ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकरी सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापन केल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात गोरक्षण केले जात असे. दिल्लीचा कारभार करणार्या महादजी शिंदे यांनी त्याकाळी मुघल बादशहाला गोहत्याबंदीचे फर्मान काढायला सांगितले होते. आजही भारतासारख्या कृषी-उद्योग-प्रधान राष्ट्रात पशुधनाचे महत्त्व ओळखून भारतीय संविधानाच्या (कलम 48) मार्गदर्शक तत्त्वात राज्याने गोवंशहत्येस प्रतिबंध करावा, असे म्हटले आहे. राजर्षी शाहू महाराज यांनीही आपल्या राज्यात गोहत्या बंदीचा हुकूम जारी केला होता. त्या हुकूमात म्हटले होते करवीर इलाख्यात यापुढे केव्हाही व कोठेही कसायास गायी विकायच्या नाहीत, तशा कोणी विकलेल्या समजून आल्यास विकणारा इसम जबर दंडास पात्र होईल म्हणून हुजूर आज्ञा तारीख 24 माहे ऑगस्ट सन 1919ची झाल्याआधारे आपल्यास असे कळविण्यात येते की, आपण आपले स्थळसीमेतील गावगन्नानिहाय सदरप्रमाणे तजवीज राहण्यास हुकूम देऊन हुकूमाची प्रसिद्धी दवंडी पिटवून करण्यात यावी.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे सामाजिक लढ्याचे रणांगण होते. थोरल्या छत्रपतींप्रमाणे त्यांना स्वकीयांशीही संघर्ष करावा लागला आणि त्यात ते यशस्वी झाले. शिवशाही आणि शाहू महाराजांचा काळ यात मोठा फरक होता, पण शिवशाहीने घालून दिलेल्या स्वधर्मपालन, लोककल्याण, युगानुकूल सुधारणा आणि पुरोगामीत्वाच्या परंपरेचे निर्वहन त्यांनी अव्याहतपणे केले. त्यांचा आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. आपला धर्म आणि संस्कृतीचा अभिमान कायम ठेवत धर्माला ग्लानी आणणार्या व सामाजिक ऐक्य तोडणार्या अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा यांचा आपण त्याग केला पाहिजे.आगामी काळात भारताला एक बलशाली राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांचे विचार आणि कार्य आपल्यासाठी दीपस्तंभ आहे.
रवींद्र सासमकर
(लेखक इतिहास अभ्यासक असून महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने आणि प्रकाशन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत.)