‘आयपीओ’ गुंतवणूक आणि खबरदारी

20 Jun 2024 22:04:44

IPO 
 
मोहित सोमण
 
भारतामध्ये दिवसेंदिवस ‘आयपीओ’ची क्रेझ वाढत चाललेली दिसते. कारण, ‘आयपीओ’च्या माध्यमातून सोयीस्कर मार्गाने पैसा उभारणी शक्य झाली आहे. अशा या ‘आयपीओ’ विषयी अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी हा लेखप्रपंच...
 
शेअर बाजारातील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आयपीओ’ (Initial Public Offer). ‘आयपीओ’ म्हणजे एखादी खासगी कंपनी ‘पब्लिक कंपनी’ होण्यासाठी शेअर बाजारात आल्यानंतर सर्वप्रथम आपले नवे समभाग (शेअर) बाजारात गुंतवणुकीसाठी ‘ऑफर’ करते. हे नवे समभाग लोक विकत घेतात व त्यानंतर कंपनी सूचीबद्ध झाल्यावर गुंतवणूकदार त्या समभागांची खरेदी-विक्री करतात.
 
या ‘आयपीओ’तून भविष्याच्या दृष्टीने नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदार पैसे गुंतवतात. भविष्यात कंपनीच्या समभागातून अतिरिक्त ‘वेल्थ’ कमवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. पण, कंपनीचे भविष्य, बाजारातील परिस्थिती, कंपनीची आतापर्यंतची कारकीर्द, कंपनीची आर्थिक स्थिती, प्रवर्तकां(प्रमोटर)चा इतिहास, कंपनीची उत्पादने व इतर माहिती नसल्यास ‘आयपीओ’त पैसे टाकणे म्हणजे अज्ञानात संकट ओढवून घेणे आहे. निदान, आपण ज्या कंपनीत पैसा गुंतवत आहोत, तो किती पटीने परत मिळू शकतो अथवा गमवू शकतो, याचे हेतुपुरस्सर केलेले विश्लेषणच गुंतवणूकदारांना बाजारात तारू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे, ही दूरदृष्टीने केलेली तरतूद.
 
गेल्या दहा वर्षांत ‘आयपीओ’चा भडीमार बाजारात होत आहे. तरुण पिढीला ‘आयपीओ’त रस वाटतो. पण, सुरुवातीला स्वस्तात समभाग विकत घेऊन नंतर ते चढ्या किमतीला विकणे, इतका सोपा ‘आयपीओ’चा फंडा नाही. कित्येकदा शेअर बाजारातील पंडितांचे अंदाजदेखील चुकतात व अर्थाचा अनर्थ होतो. हेच नुकसान टाळण्यासाठी ‘आयपीओ’तील विविध पातळ्यांवर विचार करणे गरजेचे आहे.
 
बाजारात साधारणतः महिन्याला दहा ‘आयपीओ’ हल्ली दाखल होतात. म्हणजे जेमतेम वर्षाला शंभरहून अधिक ‘आयपीओ’ असतील. एका आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये 57 कंपन्यांचे ‘आयपीओ’ बाजारात आले. या ‘आयपीओ’त 49 हजार 434 कोटींहून अधिक निधी उभारणी केली गेली होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 40 ‘आयपीओं’मधून 59 हजार 302 कोटी बाजारात दाखल झाले. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 63 ‘आयपीओ’तून 1 लाख 18 हजार 723.17 कोटी रुपये उभारले गेले. सध्याची आकडेवारी द्यायची झाली तर आगामी दोन महिन्यांत तब्बल 30 हजार कोटींचे ‘आयपीओ’ बाजारात दाखल होणार आहेत. प्राथमिक बाजारात इतकी मोठी उलाढाल क्वचितच असेल, इतकी मोठी गुंतवणूक ‘आयपीओ’त होत असते. यात प्रामुख्याने दोन प्रकार असतात. 1) मुख्य कंपन्यांचे ‘आयपीओ’ 2) ‘एसएमई आयपीओ’ (छोट्या) कंपन्याचे ‘आयपीओ’. मुख्य कंपन्यांच्या तोडीस तोड म्हणून ‘एसएमई आयपीओ’ मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारातील नव्या उद्योजकांना बँकेत जाऊन कर्ज मिळविण्यापेक्षा ‘आयपीओ’ कमी वेळात अधिक निधी उभारू शकतो, हीच उपयुक्तता लक्षात घेत ‘एसएमई’ कंपन्या मोठ्या प्रमाणात बाजारात उतरतात.
 
जेव्हा एखादी कंपनी ‘आयपीओ’साठी बाजारात उतरते, तेव्हा ती प्रथम ‘सेबी’कडे जाते. ‘सेबी’कडून ‘डीएचआरपी’ (ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रोसपेक्स्टस) अर्ज भरून दिला जातो. नियामक मंडळाने मी मान्यता दिल्यानंतर त्याची छाननी होऊन अखेर ‘आयपीओ’ बाजारात येतो. यावेळी अनेकदा केवळ स्टार्टअप कंपनी आहे अथवा प्रसिद्ध कंपनी आहे, म्हणून गुंतवणूकदार त्या ‘आयपीओ’ला पसंत करतात व गुंतवणूक करतात. यावेळी कुठली कंपनी, तिचे उत्पादन, बाजारातील दिशा, भारतातील सामाजिक, आर्थिक पातळीवर असलेली कंपनीची ओळख, कंपनीचे संस्थापक, इतक्या वर्षांचा अनुभव, शेअर बाजारातील हालचाली, भविष्यातील अनुमान व तज्ज्ञांचा सल्ला या अशा अनेक कारणांनी विचार करणे अशावेळी फायदेशीर ठरते.जेव्हा कंपनी ‘आयपीओ’साठी बाजारात उतरते, तेव्हा हा निधी कुठल्या कारणासाठी वापरला जाणार आहे, हे कंपनीला सांगणे बंधनकारक आहे. पण, अनेकदा कुठल्याही कारणासाठी का असेना अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. अखेरीस पश्चातापाशिवाय कुठलाही मार्ग उरत नाही. गेल्या काही दिवसांत मोठ्या कंपन्यांदेखील ‘आयपीओ’निमित्ताने अथवा ‘एफपीओ’ निमित्ताने बाजारात येत आहेत. नुकतीच 18 कंपन्यांना ‘सेबी’ने ‘आयपीओ’साठी मान्यता दिली. या कंपन्यांच्या माध्यमातून आगामी काळात दोन हजार कोटींची निधी उभारणी केली जाणार आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी 37 कंपन्यांनी ‘आयपीओ’साठी अर्ज केले आहेत. ‘आयपीओ’त गुंतवणूकदारांना एक लाख, दोन लाख अशी एकगठ्ठा मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे मोठ्या रकमेवर फायदाही मोठा होऊ शकतो अथवा मोठे नुकसान. याच वेळी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास पुढील अर्थसंकट टाळता येते.
 
कुठलाही ‘आयपीओ’ खरेदी करण्यापूर्वी खालील बाबींची चाचपणी करणे महत्त्वाचे. 1) शेअर बाजारातील स्थिती, 2) बाजारातील भविष्यातील अचूक भाकीत, 3) कंपनीची माहिती आर्थिक धोरणे, 4) कंपनीचे उत्पादन व त्यातील मागणी पुरवठा, 5) कंपनीच्या प्रवर्तकाविषयी माहिती, 6) ‘एफपीओ’ (फॉलो ऑन पब्लिक ऑफर असल्यास) कंपनीने यापूर्वी दिलेला परतावा, 7) ‘सेबी’ची धोरणे व नियमावली, 8) प्राईज बँड, 9) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुठल्या कारणासाठी ‘आयपीओ’चा निधी वापरला जाणार. वरील मुद्द्यांच्या आधारे ‘आयपीओ’ गुंतवणुकीपूर्वी सांगोपांग विचार केल्यास, योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत होते. दुसरीकडे किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल) गुंतवणूकदारांव्यतिरिक्त इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, इतर खासगी गुंतवणूकदारांसाठी, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी व इतर गुंतवणूकदारांसाठी देखील ‘आयपीओ’तील वाटा गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत हे गुंतवणूकदार कोण आहेत, या गुंतवणुकीतून भविष्यातील लक्ष्य कशी साध्य केली जातील, जे गुंतवणूकदारांना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
 
‘आयपीओ’ची लाट का येत आहे?
 
गेल्या दशकात भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने बाजारात मोठी वाढ झाली आहे. अनेक क्षेत्रांत मूलभूत सुविधेत वाढ झाल्याने कंपनीच्या उत्पादनात व सेवेत वाढ होत आहे. दुसरीकडे शेअर बाजारात चांगला परतावा मिळाल्याने पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजारात किंवा ‘आयपीओ’त पैसे गुंतवणूक करत आहेत. परिणामी, बाजारात धनसंचय झाल्याने अनेक कंपन्या आपल्या विस्तारीकरणासाठी ‘आयपीओ’ बाजारात आणत आहेत. यामुळे बाजारात अनेक कंपन्या आपले नशीब आजमावून पाहताना दिसतात. दुसरीकडे ‘सेबी’ने ‘आयपीओ’साठी असलेल्या अटी शिथिल केल्याने मोठ्या प्रमाणात ‘आयपीओ’मधील गुंतवणूक वाढताना दिसते. दुसरीकडे पुन्हा एकदा रालोआप्रणीत मोदी सरकार सत्तेत परतल्याने सरकारी आर्थिक धोरणे पुढे कायम राहून बाजारात स्थिरता येईल आणि गुंतवणुकीत वेगाने परतावा मिळेल, असा गुंतवणूकदारांचा कयास असल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.
 
त्यामुळे गुंतवणूकदार व कंपन्या ‘आयपीओ’तून आपले नशीब आजमावून पाहताना दिसतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते, आपण ‘आयपीओ’त गुंतवणूक करावी का आणि केल्यास काय गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याविषयी बोलताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की, ‘’एखादी गोष्ट नक्की निर्णायक वाटल्यास गुंतवणूक नक्की करावी, असाही फंडा उपयुक्त ठरत असतो. काही गुंतवणूकदार फक्त ‘आयपीओ’मध्येच गुंतवणूक करत असतात, त्यांनी आकारण्यात येणारा प्रीमियम ग्रुप, कंपन्यांचा अभ्यास करून गुंतवणूक करावी, असे वाटते. जर चुकून विना प्रीमियम ‘आयपीओ’ आल्यास ग्रुप किंवा फार अभ्यास करण्याची फार आवश्यकता नाही.”
 
यावर मत व्यक्त करताना ‘जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस’चे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ’‘लहान ‘आयपीओ’च्या अलीकडील चांगल्या कामगिरीवर आधारित अतिउत्साहाचा धोका लक्षात घेता, एसएमई (डचए) गुंतवणुकीपेक्षा मेनबोर्डला प्राधान्य देण्याची शिफारस केली जाते.”
Powered By Sangraha 9.0