प्योंगयांग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी बुधवार, दि. 19 जून रोजी प्योंगयांगमधील किम इल सुंग स्क्वेअर येथे स्वागत समारंभानंतर शिखर बैठक घेतली. रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार व्लादिमीर पुतीन यांनी दोन्ही राष्ट्रांमधील संबंध दृढ करण्याचे वचन दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तब्बल 24 वर्षांनंतर उत्तर कोरियाला भेट दिली.
कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. रशियाचे दहा मंत्री आणि अधिकार्यांचे शिष्टमंडळ पुतीन यांच्यासोबत उपस्थित आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव आणि संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांचा समावेश आहे. भेटीदरम्यान व्लादिमीर पुतीन यांनी आश्वासन दिले की, रशिया अमेरिकेचा दबाव, धमक्यांविरोधात उत्तर कोरियाला पाठिंबा देईल. त्याचबरोबर, किम जोंग यांना रशिया भेटीचे निमंत्रणही दिले.